राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज (शनिवार) १०० दिवस पूर्ण झाले आहे. या निमित्तानं शिवसेनेनं एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेनेनं सरकारनं १०० दिवसांमध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे.

शिवसेनेनं जारी केलेला व्हिडीओ केवळ १११ सेकंदांचा असून १०० दिवसात सरकारनं काय केलं हे १११ सेकंदांमध्ये पाहा असं त्यावर लिहिण्यात आलं आहे. शिवसेनेनं आपल्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. ठाकरेंचा नवा महाराष्ट्र दाखवत असून तुम्ही सज्ज आहात का? असा सवाल सुरूवातीला यात करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राज्यातील सरकारनं आतापर्यंत कोणते मोठे निर्णय घेतले हे सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे वचन दिले होते, सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांतच हे सरकार त्या वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. pic.twitter.com/CpDBdUVSQl

— ShivSena – शिवसेना (@ShivSena) March 6, 2020

तर दुसरीकडे काल अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आपण १०० दिवसांत काय केलं याची माहितीही शिवसेनेनं आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे वचन दिले होते, सरकार स्थापन झाल्यानंतर १०० दिवसांतच हे सरकार त्या वचनपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.