रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत शिंदे गटाच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने विरोधकांचे राजकीय बळ अक्षरशः उद्ध्वस्त करत एकतर्फी सत्ता काबीज केली आहे.
तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट आणि २० पंचायत समिती गणांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत रत्नागिरीच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी दिली आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होताच निकालांनी विरोधकांची गणिते कोलमडली. शिवसेनेच्या विजयाची घोषणा होताच मतमोजणी केंद्र परिसरात विजयाचा स्फोट झाला. गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा निनाद आणि “शिवसेना जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हा जल्लोष केवळ आनंदाचा नव्हे, तर विरोधकांना दिलेला राजकीय इशाराच असल्याची चर्चा रंगली.
विजयी उमेदवार बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत महायुतीच्या संघटनशक्तीचा प्रत्यय दिला. या निकालाने तालुक्यात शिवसेना-भाजप युतीची पकड अधिक घट्ट झाली असून, विरोधी गटांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. हा विजय योगायोग नसून, नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेने दिलेला ठोस कौल आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला आणि कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेला मिळालेली ही पावती असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. विरोधकांसाठी हा निकाल केवळ पराभव न राहता, राजकीय अपयशाची कबुली ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रत्नागिरी तालुक्यात शिवसेना-भाजप युतीचा विजयी गुलाल उधळत असतानाच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा केंद्रबिंदू कोणाच्या हाती आहे, हे या निकालाने ठामपणे अधोरेखित केले आहे. तालुक्याच्या राजकारणात आता महायुतीचा दबदबा आणि आक्रमक राजकीय वाटचाल अटळ असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.
