शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या राज्यभर सभा घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज (२ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची मोठी सभा होणार आहे. याआधीच्या उद्धव ठाकरेंच्या खेड (रत्नागिरी) आणि मालेगावच्या (नाशिक) दोन्ही सभांना नागरिकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता महाविकास आघाडीची आज तिसरी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. दरम्यान, या सभेआधी शिवसेनेच्या शिंदे गटाने संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी करून उद्धव ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जुना फोटो आहे. त्यावर लिहिलं आहे की, “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही.” उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. शिवसेना या दोन पक्षांसोबत अडीच वर्ष राज्यात सत्तेत होती. आता या दोन पक्षांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत. उद्धव ठाकरेंचं काँग्रेससोबत जाणं भाजपा आणि शिंदे गटाला चुकीचं वाटतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी बाळासाहेबांच्या जुन्या वाक्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी संपूर्ण शहरभर हे बॅनर लावले आहेत. शहरातील कोकणवाडी चौकातील एक मोठा बॅनर सर्व शहरवासियांचं लक्ष वेधून घेत आहे. “मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही” असं बाळासाहेबांचं वाक्य यावर दिसत आहे.
हे ही वाचा >> “गीदड की खाल…”, साईबाबांवरील प्रश्नावर धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “त्यांना ईश्वराचं स्थान…”
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी
छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेची तयारी करत आहेत. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते नाना पटोलेदेखील उपस्थित असण्याची शक्यता आहे.