Sanjay Shirsat : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. काही नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. मात्र, असं असतानाच महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? आणि जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला मिळाव्यात यासाठी नेते प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. अद्याप कोणता पक्ष किती जागा लढवणार? याबाबत निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. “भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते. दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपाला उशीर झाला, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आले होते. मुळामध्ये महायुतीत भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्यामुळे किंवा त्यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार आहे. जर तडजोड करायची असेल तर विधानसभा निवडणुकीत जागावाटप कशा पद्धतीने करायचं? हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे स्वत: आले. ते हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी; जागा वाटपात मतदारसंघ, उमेदवारांचीही वाणवा

संजय शिरसाट यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही हल्लाबोल केला. संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता येणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही वाट पाहिली तरी या पाच वर्षात तरी महाविकास आघाडीचे सरकार येणार नाही. तसेच एनडीएचं केंद्रातील सरकार कोसळणार नाही. केंद्रातील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन”, असंही शिरसाट यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी नोटा उधळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “पैसे उधळणे हे चुकीचे आहे. काही वेळा एखादा कार्यकर्ता उत्साहात काम करायला जातो आणि त्याला हे कळत नाही की आपल्यामुळे कोण अडचणीत येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील योग्य ती कारवाईची भूमिका घेतली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.