लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळालं होतं. नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. यानंतर त्या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये हेमंत गोडसेंचा पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. मात्र, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यासंदर्भात राजकीय नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनीही यावर भाष्य केलं आहे. “छगन भुजबळ नाराज असल्याचं मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत नाही. मात्र, त्यांनी खंत व्यक्त केली. पण नाशिकच्या जागेवर आमचा विद्यमान खासदार असल्यामुळे आम्ही त्या जागेवर लढलो, त्यामुळे भुजबळांवर अन्याय करण्याचा आमच्याकडून कुठेही प्रश्न येत नाही”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा : “लोकसभा जिंकण्यासाठी काँग्रेसचीही मदत मिळाली”, सुनील तकरेंच्या दाव्याने मविआ चिंतेत; नेमका रोख कोणाकडे?

शंभूराज देसाई काय म्हणाले?

“ज्या जागा ज्यांच्या पक्षाच्या आहेत, त्या जागा त्यांना द्यायच्या या सूत्राप्रमाणे नाशिकची जागा कोणाची होती? त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार होते. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने नाशिकच्या जागेवर आमचा हक्क होता. छगन भुजबळ म्हणत असतील तसं मध्यतरीच्या काळात वरिष्ठ पातळीवर काही चर्चा झाल्या असतील, तर त्या संदर्भात आम्हाला कोणालाही कल्पना नाही. जेव्हा आम्ही जागावाटपाला सुरुवात केली, तेव्हा ठरलं होतं की ज्या पक्षाचे जे खासदार आहेत, त्या पक्षाला ते तिकीट देण्यात येईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध केला असं म्हणण्याची आवश्यता नाही. आमचं ठरलं होतं की शिवसेनेचे जे १३ खासदार आहेत, त्या ठिकाणी आम्ही लढणार, त्यामुळे छगन भुजबळ यांच्यावर अन्याय करण्याचा कोठेही प्रश्न येत नाही”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

“छगन भुजबळ यांनी आता कसा संदर्भ जोडायचा तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, निवडणुकीमध्ये जातीय समीकरणं डोळ्यासमोर ठेवून कधीही तिकीट वाटले जात नाही. त्या मतदारसंघात विद्यमान खासदार किंवा विद्यमान आमदार कोण आहेत? त्या ठिकाणी कोणाचा प्रभाव आहे. लोकांची मागणी काय आहे? त्या मतदारसंघातील आमदारांनी किंवा खासदारांनी केलेलं काम कसं आहे? या सर्व गोष्टी पाहून ठरवलं जातं. मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणे सांगतो. हेमंत गोडसे हे नाशिकमध्ये विद्यमान खासदार होते. त्यामुळे त्यांच्यासाठी आमचा पक्ष आग्रही राहणं सहाजिक आहे”, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

भुजबळ नाराज आहेत का?

छगन भुजबळ नाराज आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शंभूराज देसाई म्हणाले, “मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली नाही. मात्र, त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मी लोकसभेला इच्छुक होतो. मात्र, त्यावेळी संधी मिळाली नाही. त्यामुळे मी थांबलो, असं त्यांनी म्हटलं असलं तरी ते नाराज आहेत, असं त्यांच्या चेहऱ्यावरून वाटलं नाही”, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.