अलिबाग– जिल्हा परिषद निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट एक्शन मोडवर आला आहे. पक्षातील अकार्यक्षम आणि पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात पक्षाने व्यापक कारवाईला सुरूवात केली आहे. ज्याची सुरवात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे रोहा तालुक्यापासून झाली आहे. शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रोहा तालुका कार्यकारिणी विसर्जित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
राजा केणी यांच्या या निर्णयामुळे रोह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या महिन्याभरात नवीन कार्यकारीणीची निवड केली जाणार असून, लोकशाही पध्दतीने यासाठी निवडणप्रक्रीया पार पडेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. नगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर रोह्यातील तालुका कार्यकारीणी विसर्जित करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे जाहीर केले आहे.
शिवसेना शिंदे गटाने रोहा नगर पालिका निवडणुक भाजपसोबत लढवली होती. मात्र पक्षाला निवडणूकीत अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षातील अनेक नेते पक्षाच्या उमेदवारांना मदत करण्याऐवजी विरोधकांशी संधान बांधत असल्याचे लक्षात आले. जिल्हा परिषद निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे संपुर्ण तालुका कार्यकारीणी विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी रोहा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले.
महत्वाची बाब म्हणजे या बैठकीत पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनोज शिंदे हे रोह्याचे माजी तालुका प्रमुख होते. सध्या ते उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिका निवडणुकीपासून शिंदे हे तटकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केणी यांनी केला. पक्षात गद्दारी खपवून घेतली जाणार नाही म्हणत त्यांनी मनोज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे रोहा परिसरात खळबळ उडाली आहे. उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत असलेल्या नेत्याची तडकाफडकी हकालपट्टी झाल्याने, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या कारवाई नंतर मनोज शिंदे यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान रोहा तालुक्याची नविन कार्यकारीणी लवकरच जाहीर केली जाईल, लोकशाही पध्दतीने यासाठी निवडप्रक्रीया पार पडले, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जातील, आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन नविन कार्यकारीणी निवडली जाईल असेही केणी यांनी जाहीर केले आहे.
