Sanjay Shirsat On Uddhav Thackeray Delhi Visit : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या नेतेमंडळींचे राजकीय दौरे सुरु आहेत. या माध्यमातून नेते आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून आढावा घेत आहेत. आता राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीतील महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. यावरूनच शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. "उद्धव ठाकरे दिल्लीत देवदर्शनासाठी गेलेत", असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Manoj Jarange Patil : “बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा, आरक्षण हा…”; मनोज जरांगे यांचे विधान! संजय शिरसाट काय म्हणाले? "माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासह दिल्लीला देव दर्शनासाठी गेले आहेत. सोनिया देवी आणि राहुल देव असे त्यांचे मंदिर तिकडे आहेत. त्यांच्या दर्शनासाठी ते तिकडे गेले आहेत. आता त्यांना कळेल की इतरांवर टीका करणं किती सोप्प असतं. स्वत: लोकांच्या चरणी लीन झाल्याशिवाय राजकारणात तग धरता येत नाही, याची जाणीव त्यांना झाली असेल", असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी केला. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले तर लगेच दिल्लीश्वरांच्या चरणी गेले, अशी टीका केली जाते. मग आता उद्धव ठाकरे कोणाच्या चरणी लीन होण्यासाठी दिल्लीला गेले आहेत? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. तुम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर दिल्ली गाठावीच लागते, हे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका बदलली आहे. त्यामुळेच ते दिल्लीला भेटीसाठी गेले आहेत. उद्धव ठाकरेंचे हृदयसम्राट आता राहुल गांधी आहेत. जा त्यांच्या चरणी लीन व्हा आणि महाराष्ट्रात येऊन स्वाभिमानाच्या गप्पा मारा. त्यामुळे आम्ही जे म्हणतो ना की शिवसेना प्रमुखांचे विचार त्यांनी पायदळी तुडवले, हे त्याचंच उदाहरण आहे. त्यांनी कितीही बडबड केली तरीही ते लाचार आहेत", असा हल्लाबोल संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.