मुंबई: राज्यात काँग्रेस भाजपमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टिपू सुलतान वाद शिगेला पेटलेला असताना महायुतीत एकनाथ शिंदे व गणेश नाईक समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या नंतर नाईक यांच्या विधानावर उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार, नरेश म्हस्के, निलेश राणे, रविंद्र धंगेकर, ज्योती वाघमारे तुटून पडले आहेत. नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. शिंदे सेना नाईकांवर टीका करीत असताना नाईकांची पाठराखण करण्यास एकही भाजप नेता पुढे आला नाही.
नाईक यांनी एका मुलाखतीत श्रीकांत शिंदे यांना ‘माजी खासदार करुन टाकेन’ असे विधान केले. त्यावरुन नाईकांवर शिंदे सेनेकडून जोरदार टीका सुरु झाली आहे. नाईकांच्या या टिकेला श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. पुढील निवडणुकीत नाईकांनी ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदार संघात माझ्यासमोर उभे राहून दाखवा. त्यांची खुमखुमी जिरवली जाईल. त्यांना स्मृतीभ्रमंश झाला आहे. त्यांच्या घरात यापूर्वी त्यांच्यासह सर्वजण माजी झाले आहेत. अशी टीका करुन श्रीकांत शिंदे यांनी नाईकांना पुन्हा डिवचले.
एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व देशाने मान्य केले आहे. त्यांच्यावर टीका करुन प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा नाईक प्रयत्न करीत आहेत. नाईक बोलत असलेल्या विधानाशी भाजप किंवा मुख्यमंत्री सहमत नाहीत. नाईकांचा बोलविता धनी कोणी नाही. त्यांना त्यांची प्रतिमा टिकवून ठेवायची असेल तर त्यांनी हे उद्योग बंद करावेत. पक्षाचे सचिव राहुल शेवाळे आणि मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाईकांची तक्रार करणार आहोत. त्यानंतरही ते शांत बसले नाहीत तर ‘ज्या गावाच्या बोरी त्या गावच्या बाभळी’ माहित असल्याने शिवसेना ‘जशास तसे’ उत्तर देईल असा इशारा उदय सावंत यांनी दिला.

