जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध असून हा विरोध भाजपकडून दडपला जाणार असेल, तर शिवसेनेने राज्य व केंद्रातील सत्तेतून बाहेर पडावे, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.
सोलापुरात शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी विखे-पाटील हे आले होते. नंतर पत्रकारांशी वार्तालप करताना त्यांनी भाजप-शिवसेनेच्या संबंधावर भाष्य केले. सेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे. तर भाजपने हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिीत बंद न होता पूर्ण होणारच, अशी निर्णायक भूमिका घेतली आहे. त्याचा विचार करता शिवसेनेचा या प्रकल्पाला खराच विरोध असेल, तर सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस शिवसेनेला दाखवावे लागेल. शिवसेनेने सत्तेसाठी लाचार होऊ नये. वादाच्या मुद्यावर पटत नसेल तर सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय लोकांनाही शिवसेनेच्या भावना स्पष्ट समजणार नाहीत, असे मत विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करणार नाहीत तर केवळ गुजरातचा विकास करणे हेच एकमेव ध्येय असल्याची टीका करताना ते म्हणाले, महाराष्ट्रातूनही काही उद्योग प्रकल्प गुजरातकडे चालले असताना ते रोखण्याची हिंमत राज्यातील भाजप-सेना शासनाकडे नाही. राज्य सरकारचे कोठे अस्तित्वच दिसत नसल्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटण्याची शक्यता आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भरमसाठ आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपने आपले खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सामान्य जनतेची घोर निराशा झाली आहे. शेतक ऱ्यांशी भाजप सरकारचे काहीही देणेघेणे नाही, तर भांडवलदारांना पोसण्याचे काम भाजपने आपल्या धोरणातून हाती घेतले आहे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.