अलिबाग : पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेनेने मेळावा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माणगाव येथे झालेल्या या मेळाव्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ या निमित्ताने फोडण्यात आला.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत. अलिबाग, महाड आणि कर्जत या मतदारसंघांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. असे असूनही आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यासाठी श्रीवर्धन मतदारसंघातील माणगावची निवड करण्यात आली. करोनापश्चात होणाऱ्या या जाहीर मेळाव्याला गर्दी जमवून शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

गेल्या काही दिवसांत रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेच्या तीनही आमदारांनी ‘पालकमंत्री हटावचा नारा’ दिला आहे. निधी वाटपात शिवसेना आमदारांची होणारी कोंडी आणि विकासकामांचा श्रेयवाद हा या नाराजीला कारणी ठरला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कुरघोडय़ा सुरूच आहे. यातूनच आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील माणगाव ठिकाण निवडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा पालकमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय जरूर घ्या. मात्र आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही आमचे म्हणणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. ते त्यावर निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचल्या असल्याचा ओझरता उल्लेख यावेळी केला. मात्र आदित्य ठाकरे यांनी आमदारांच्या नाराजीबाबत कुठलेही जाहीर वक्तव्य केले नाही. उलट ‘पालकमंत्री हटाव’च्या घोषणा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि तसे बॅनर झळकवण्याचे प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी रोखले.

शिवसेनेच्या मेळाव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कुरबुरींची जाहीर वाच्यता होणार नाहीत याची खबरदारी चारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली. मात्र त्याच वेळी माणगावमध्ये मेळावा घेऊन शिवसेनेने ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न मात्र केला. जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल असा निर्धार यावेळी सर्वानी बोलून दाखवला.

ठाकरेंचा तटकरेंकडे पाहुणचार माणगाव येथील शिवसेना मेळावा संपवून आदित्य ठाकरे परतीच्या मार्गावर निघाले. सुतारवाडी येथे जाऊन तटकरे कुटुंबाची सदिच्छा भेट घेतली, पाहुणचार घेतला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब त्यांच्यासमवेत होते. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांवर लागलीच पोस्ट टाकून या भेटीची माहिती दिली. आदित्य ठाकरेंचे कौतुक केले. या भेटीमुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरल्याचे पाहायला मिळाले.

माणगाव नगरपंचायतीसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत आघाडीची सत्ता आली होती. त्याचबरोबर हे ठिकाण जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसाठी मध्यवर्ती आणि सोयीस्कर आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्यासाठी माणगावची निवड करण्यात आली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करूनच ठिकाण निश्चित करण्यात आले होते.

– भरत गोगावले, आमदार शिवसेना