सतीश कामत, लोकसत्ता

रत्नागिरी : शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातून निवडून आलेले तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झाले असले तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या ७  आमदारांपैकी फक्त योगेश कदम वगळता उरलेले सर्व जण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिल्यामुळे येथील तटबंदीला फारसा धक्का बसलेला नाही.  रायगड जिल्ह्यातील महेंद्र दळवी (अलिबाग), भरत गोगावले (महाड) आणि महेंद्र थोरवे (कर्जत) या तिन्ही आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या मंत्री असलेल्या कन्या आदिती यांच्या बेलगाम कारभाराला पायबंद घातला जात नसल्याने पक्षाचे अन्य पदाधिकारीही पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. तीनही आमदारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने रायगडच्या पालकमंत्री बदला, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीकडे फारसे लक्ष दिले नव्हते. माणगाव येथील आदित्य ठाकरे यांच्याही सभेत तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे यांच्या विरोधात सूर लावला होता; पण आमदारांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत आदित्य यांनी तटकरे यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला होता. या नाराजीतूनच पक्षनेतृत्वाविरोधात आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याचे दिसून येत आहे.

in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा
I did not know that MLA Sanjay Gaikwad will fill the application form says vilas parkar
“आमदार गायकवाड अर्ज भरणार हे मलाही ठाऊक नव्हते, आता सीएम साहेबच…”
Liquor stock worth 28 lakh seized Gadchiroli action befor elections
गडचिरोली : २८ लाखांचा मद्यसाठा जप्त; निवडणुकांचा पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

रत्नागिरी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील विधानसभेच्या पाच जागांपैकी चिपळूण वगळता (आमदार शेखर निकम) उरलेल्या चारही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यापैकी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत; पण  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, माजी मंत्री भास्कर जाधव आणि ज्येष्ठ आमदार राजन साळवी हे तिघेही  ठाकरेंबरोबर आहेत. विधिमंडळ राजकारणात तिघेही जण मुरलेले आहेत. तिघांमध्ये भास्कर जाधव सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पुन्हा शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांचा प्रभाव गुहागर-चिपळूण तालुक्यात आहे. सामंतांची, कारकीर्दीची पहिली १० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेना, अशी राजकीय वाटचाल आहे. या दोघांचे एकमेकांशी फारसे सख्य नाही. साळवी पक्षाचे सर्वात जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.  तरी मंत्रिपद आणि संघटनात्मक पकड, या दोन्हीबाबत सामंत तिघांमध्ये वरचढ राहिले आहेत. ते ठाकरेंबरोबर राहिले तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद बऱ्याच प्रमाणात शाबूत राहील, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नगर परिषदा, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

कोकणात गद्दारी आवडत नाही – आमदार नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दबदबा आजही कायम आहे. जोडीला त्यांचे चिरंजीव आमदार नितेश व माजी खासदार नीलेश शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात कसूर ठेवत नाहीत. जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांपैकी उरलेल्या दोन ठिकाणी दीपक केसरकर (सावंतवाडी) आणि वैभव नाईक (मालवण) शिवसेनेकडून निवडून आलेले आहेत. यापैकी केसरकर यांची भूमिका भाजपशी युती करावी, अशी राहिली आहे.  नाईक मात्र सतत राणेंशी संघर्ष करत आले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोन वेळा आमदारकी दिलेल्या पक्षाशी आपण गद्दारी करणार नाही, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. तसे केलेल्या राणेंना येथील जनतेने पराभूत केले, असेही निदर्शनास आणून दिले. राणेंशी राजकीय सामना सुरूच राहणार का, असे विचारले असता, ते मुख्यमंत्री, महसूलमंत्री होते तेव्हापासून आम्ही संघर्ष करत आलो आहोत. त्यामुळे काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी दिली.

भाजपबरोबर जाण्याचा केसरकर यांचा आग्रह

शिवसेनेने भाजपबरोबर जावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मी दोन वर्षे मांडत आहे, असे माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात आजही सुरू असलेल्या चर्चेत माझा खारीचा वाटा आहे. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. मी आजही पक्षाशी प्रामाणिक राहिलो आहे. मला जाण्यासाठी कोणी भाग पाडू नये. सद्य:स्थितीत घर जळत आहे. त्यामुळे आधी ही आग विझवण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांचेही हेच मत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. केसरकर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीनंतर हॉटेलमधून बाहेर पडले तेव्हा त्यांना शिवसैनिकांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला होता. ही गुंडगिरी मी खपवून घेणार नाही. उलट कोकणातील दादागिरीविरोधात मी लढलो आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.