Shiv Sena Symbol Case Supreme Court: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आजही (१३ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. ‘अपात्रता केली असती तर बहुमत आमचंच होतं, फुटीनंतर पक्षाची घटना मान्य नाही, असं म्हणणं चुकीचं’, अशा विविध मुद्यांवर कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

आज झालेल्या सुनावणीत सिब्बल यांनी अनेक कायदेशीर त्रुटींवर बोट ठेवलं. आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं भाष्य केलं आहे. ‘निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच ठरलेला होता, त्यानंतर एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले’, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. मात्र, ‘आमचाच विजय होईल’, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली, आज आमचा जो युक्तिवाद होता, तो युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या प्रत्येक बेकायदेशीर कृतीबाबत होता. या देशातील निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे काम करण्याची गरज आहे. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्याबाबतीत किती बेकायदेशीरपणे काम केलं हे सर्वांनी पाहिलं. पक्षपातीपणे निर्णय देऊन एका बेकायदा गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात काही उदाहरणंही दिले आहेत. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालयाचंही समाधान झालं असं आम्हाला जाणवलं. आता पुढची सुनावणी मंगळवारी होईल”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

या प्रकरणामध्ये कोणाची जास्त चुकी आहे असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोगाने शे## खाल्लं. याची किंमत मी सकाळी सांगितली. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. देशाच्या संविधानावर हात ठेवून केलेला हा भ्रष्टाचार आहे. निवडणूक आयोगाने एक बेकायदेशीर मार्ग तयार केला. त्या मार्गावरून ते गेले आणि एका बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता दिली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच ठरलेला होता’ : संजय राऊत

“निवडणूक आयोगाचा निर्णय आधीच ठरलेला होता. तो निर्णय व्हावा, यासाठी मोठं षडयंत्र रचलं गेलं. निकाल आधी ठरल्यानंतर हे लोक गुवाहाटीला गेले. जोपर्यंत आमदारांच्या फुटीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेणं अपेक्षित नव्हतं”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘विजय आमचा होईल’ : राऊत

“ईडी, सीबीआयचा वापर करून आमदारांना त्यांच्याकडे वळवण्यात आलं आणि बहुमताच्या दिशेने त्यांनी त्यांची गाडी वळवली, या मुद्यांवर देखील कपिल सिब्बल यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. असं आहे की जेथे धर्म तेथे विजय असं सुप्रीम कोर्टाच्या शिरोभागी लिहिलेलं आहे. त्यामुळे जेथे धर्म तेथे विजय असतो. त्यामुळे आम्ही सत्य आणि धर्माच्या बाजुने आहोत. त्यामुळे विजय आमचा होईल”, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.