Shiv Sena Symbol Case Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्वाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मंगळवारी या खटल्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. मंगळवारची सुनावणी समाप्त झाल्यानंतर संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई न्यायालयातून बाहेर पडले. न्यायालयाच्या परिसरात शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी बोलत असताना ठाकरेंच्या सेनेचे नेतेही तिथं हजर झाले. यावेळी म्हस्के आणि ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांमध्ये हलका फुलका संवाद रंगला, याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

म्हस्के आणि ठाकरेंचे खासदार एकाच ठिकाणी आले

शिवसेनेबाबत महत्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असून, मंगळवारी तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सुनावणी समाप्त झाल्यानंतर संजय राऊत आणि वकिलांची टीम न्यायालयातून बाहेर पडली. यावेळी न्यायालयाच्या परिसरात शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के माध्यमांशी सुनावणीप्रकरणी संवाद साधत होते. म्हस्केंनी बाईट दिल्यानंतर राऊतांसह इतर नेत्यांनी इथं प्रवेश केला. राऊतांनी म्हस्केंना पाहून बोलावले. पण, म्हस्केंना जागेवरच उभं राहत येण्यास नकार दिला.

नेमकं काय घडलं?

राऊतांनी यानंतर म्हस्केंच्या दिशेने हात केला आणि खासदार अनिल देसाई म्हस्केंच्या दिशेने जायला लागले. पण, नरेश म्हस्केंनी हातवारे करत येण्यास नकार दिला आणि पाठ फिरवून विरुद्ध दिशेने जायला लागले. राऊतांनी यावेळी, ‘यावचं लागेल’, असे म्हटल्याचे समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. शिंदेसेनेचे खासदार म्हस्के आणि ठाकरे सेनेच्या खासदारांमध्ये सर्वोच्य न्यायालयाच्या बाहेर रंगलेल्या या संवादानंतर परिसरात उपस्थित असणाऱ्यांमध्ये एकच हाशा पिकला. या घटनेचा व्हिडीओ समोर आहे.

सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी

मंगळवारी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अधिकारक्षेत्रावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेनेच्या आमदारांनी स्वतंत्र बैठका घेतल्या म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली, असा त्याचा अर्थ होत नाही. २०१८ मधील शिवसेनेची पक्षघटना लोकशाहीविरोधी असल्याचे कारण देत शिंदे गटाने ती अमान्य केली; मात्र, याच पक्षघटनेच्या आधारे पदे मिळवली, निवडणुका लढवल्या आणि मंत्रीपदेही भूषविली. मग हीच पक्षघटना केंद्रीय निवडणूक आयोगाने का फेटाळली? पक्षघटनेत ‘मुख्यनेते’ हे पदच नसताना एकनाथ शिंदे यांनी ते पद कसे स्वीकारले? पक्षाची घटना लोकशाहीवादी आहे की लोकशाहीविरोधी, हे ठरवणे निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेतच नाही, मग, शिंदे गट हीच मूळ शिवसेना का मानले गेले आणि विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट का ठरवले गेले, असे प्रश्न सिबल यांनी उपस्थित केले. दरम्यान, आजही याप्रकरणी सुनावणी होणार आहे.