अहिल्यानगर : ठाकरे गटातून फुटलेल्या सहा खासदारांचा निषेध करण्यासाठी अहिल्यानगर शहरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले खरे मात्र गटबाजीतून दोन स्वतंत्र आंदोलने आज, शुक्रवारी करण्यात आली. जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली दरवाजा परिसरात तर महानगर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नवीपेठेत स्वतंत्र आंदोलन करण्यात आले.

अहिल्यानगर शहरात ठाकरे गटाची परिस्थिती बिकट असतानाही गटबाजीतून दोन स्वतंत्र आंदोलने करण्यात आल्याने त्याची चर्चा होत आहे. आमच्या आंदोलनात केवळ निष्ठावान कार्यकर्ते सहभागी होते, असा दावा गिरीश जाधव यांनी केला तर महाविकास आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आल्याचे किरण काळे यांनी सांगितले.

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे ज्यावेळेस नगर शहरात येतील त्यावेळेस त्यांचे कपडे फाडून त्यांना मारू, असे वक्तव्य जिल्हा उपप्रमुख जाधव यांनी आंदोलनावेळी बोलताना केले. आंदोलनात फुटलेल्या सहा खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारण्याचे, त्यांच्या प्रतिमा पायदळी तुडवण्याचे व निषेधाच्या घोषणाबाजीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मुन्ना भिंगारदिवे, पप्पू भाले, महेश शेळके, योगीराज गाडे, प्रशांत पाटील, जेम्स आल्हाट, गिरीश हांडे आदी सहभागी होते.

तर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसेनेसह शरद पवार गट, आरपीआयचा गवई गट यांनी फुटीर सहा खासदारांच्या प्रतिमेची गाढवावरून मिरवणूक काढली व त्यांच्या प्रतिमांना जोडे मारत पायदळी तुडवण्यात आले तसेच फुटीर खासदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संजय झिंजे, रावजी नांगरे, दीपक भोसले, मनोज गुंजेचा, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, प्रतिक बारसे, सुशांत म्हस्के, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना घाटगे, शैला लांडे, विकास गुंदेचा, सागर चाबुकस्वार, स्वप्निल साठे, महावीर मुथा, किशोर कोतकर, आदी सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. फुटलेल्या गद्दारांना महाराष्ट्र माफ करणार नाही. फुटलेल्या खासदारांनी जनादेशाचा अपमान केला आहे. सध्या देश महागाईमध्ये होरपळत आहे, बेरोजगारी वाढली आहे अशा परिस्थितीत निवडणुका जिंकण्यासाठी व आगामी अधिवेशनापूर्वी तृणमूल काँग्रेस व ठाकरे गट पुन्हा फोडला जात आहे. आता त्यांचा पुढचा निशाणा शरद पवार गट आहे, असा आरोप किरण काळे यांनी केला.