विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी मतदारसंघांचा आढावा घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु आहे. विधानसभेच्या जागा वाटपाबाबतही चर्चा होत आहेत. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल टी-२० विश्वचषकात विजय मिळवलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या विधानभवनातील सत्कार सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली. "आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करत आहोत", असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं होतं. यावर आता ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. "सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे निवडणुकीत कळेल", अशा इशारा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. हेही वाचा : “आता फक्त दाऊदला क्लीन चिट…”, रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊत यांचा टोला अंबादास दानवे काय म्हणाले? "सामना संपलेला नाही. विधानसभेची निवडणूक पूर्ण होईल, त्या दिवशी सामना संपेल. मग त्या दिवशी कळेल की कोणी कोणाची विकेट घेतली. कोणी कोणाला निवृत्त करायला भाग पाडलं. कोणाला जनतेनं नाकारलं. मला असं वाटतं की, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील त्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होईल", असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले होते? भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या विधानभवनातील सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते, "माझ्या आधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चांगलीच बॅटिंग केली. आमचं राजकारण क्रिकेटसारखंच आहे. यातही कुणी, कुठे, कशी विकेट घेईल काही सांगता येत नाही. जसं सूर्यकुमारचा कॅच कुणी विसरू शकत नाही, तसं आमच्या ५० जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही. दोन वर्षांपासून आम्ही सर्व बॅटिंग करतोय. क्रिकेटपासून लोकांना जो आनंद मिळतो, तसाच आनंद राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर खुलावा, असा आमचा प्रयत्न आहे. क्रिकेट हा खेळ कुठल्याही जाती-धर्माचा नाही. आमच्या राजकीय क्षेत्रात मात्र कोण कधी कुणाला बाद करेल, कुणाला रन आऊट करेल, हे सांगता येत नाही", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.