जालना : शिवसेनेचे (ऊद्धव ठाकरे) जालना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर बुधवारी (दिनांक १२ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकल्याकडून सांगितले जात आहे. बुधवारी शिंदे यांच्या उपस्थितीत जालना शह‌रात होणाऱ्या जाहीर सभेत अंबेकर यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे.

अंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंद‌र्भात स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. परंतु शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या शक्यतेचा स्पष्ट इन्कारही केला नाही आणि आपण कार्यकर्त्यांच्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले.

अंबेकर गेली साडेतीन दशकांपेक्षा अधिक काळ ते शिवसेनेत आहेत. पक्षात फूट पडल्यावर त्यांनी शिंदे यांच्या सोबत जाण्याऐवजी उध्दव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या राजकारणापासून पुढील काळात आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत असणारे अंबेकर शिवसेनेतील फुटीनंतर मात्र, त्यांच्या सोबत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले नव्हते. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची साथ सोडून आता ते राजकीय दृष्ट्या पुन्हा खोतकर यांच्यासोबत एका पक्षात येण्याची शक्यता आहे.

अंबेकर यांचे नेतृत्व स्थानिक नगरपरिष‌देच्या राज‌कारणातून पुढे आलेले आहे. जवळपास ‌वीस वर्षे ते नगर परिषद सदस्य होते. दोन वेळेस ते नगराध्यक्ष होते. यापैकी एकदा ते प्रत्यक्ष निवडणुकीतून विजयी झाले होते. २०१९ पासून ते उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. शिवसेनेचे जालना शहरप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि जालना बाजार समितीचे उपाध्यक्ष, राज्य बियाणे महामंडळाचे संचालक इत्यादी पदांवर राहीलेले अंबेकर शैक्षणिक , क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहेत.

२००९ मध्ये शिवसेनेने त्यांना विधान सभेची उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना यश आले नव्हते. जालना विधानसभेचे पाच वेळेस प्रतिनिधित्व करणारे अर्जुन खोतकर यांचे महाविद्यालयीन जीवनापासूनचे मित्र अशी अंबेकर यांची ओळख आहे. कांही दिवसांपूर्वी त्यांनी खोतकर यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यापासून अंबेकर यांच्या शिवसेनेच्या (शिंदे) पक्ष प्रवेशाविषयी चर्चा सुरु झाली आहे.