आज पहाटे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं प्रत्येक अपक्ष आमदाराला बोलावून विकास निधी देण्यावरून धमक्या दिल्या असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच शिवसेनेच्या धमकावण्याविरोध आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं अपक्ष आमदारांना बोलावून धमक्या दिल्या. अजून अडीच वर्ष आमचं सरकार आहे, त्यामुळे विकास निधीसाठी आमच्याकडेच यावं लागेल. मत नाही दिलं तर याद राखा, अशा धमक्या शिवसेनेनं दिल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच शिवसेनेनं अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपये देण्याचं आमिष दाखवलं, असंही ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले की, “भाजपा तिसरी जागा जिंकणारच होती. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला की, हा हट्ट करू नका. गेल्या २४ वर्षात महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या नाहीत. आमच्याकडे भाजपाची ३० मते आहेत, त्यामुळे तुम्ही कशासाठी हट्ट धरता. विधान परिषदेला पाचवी जागा जिंकता येते तरीसुद्धा बिनविरोध होऊ, असंही आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही.”

हेही वाचा – “ज्येष्ठ मंत्र्यांची ९ मतं आम्ही संजय पवारांना दिली पण…”, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान

राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे महाविकास आघाडी काही शहाणपण शिकेल का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, “त्यांना फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण शिकता येत नसेल तर त्यांना तसेही फटके मिळतील. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही सहा जागा विजयी करणार आहोत. तुम्ही म्हणाल हा काय अतिआत्मविश्वास आहे. पण हा आत्मविश्वास आहे, हे एक गणित आहे. जिथे मतं दाखवून टाकावी लागतात, तिथे आम्हाला जर अकरा मतं जास्त मिळत असतील, तर विधान परिषदेत गुप्त पद्धतीने मतदान केलं जातं. त्यामुळे तेथे आम्ही सहा जागा विजयी करणार” असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.