महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून राज ठाकरेंच्या घरी जात त्यांच्या घरी असलेल्या गणरायचं दर्शन घेतलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी परिधान केलेले एकसारखे झब्बे लक्ष वेधून घेत होते.
ठाकरे बंधूंचं गणेश पूजन आणि खास सेलिब्रेशन
मुंबईतल्या दादरमध्ये राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे मागच्या वर्षीही गणेश उत्सवाच्या दरम्यान गेले होते. तीच परंपरा कायम ठेवत या वर्षीही उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर या दोघांनी आरतीही केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परिधान केलेल्या सेम सेम झब्ब्यांची चर्चाही सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर सुरु झाली. ANI ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
राज ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी दादरच्या कृष्णकुंजऐवजी नव्या शिवतीर्थमध्ये वास्तव्य सुरू केले. आलिशान सजावटीमुळे शिवतीर्थ हे राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतं. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे पहिल्यांदाच या निवासस्थानी आले होते. यानंतर या दोघांची युतीही महापालिका निवडणुकांमध्ये झाली. मात्र त्याचा फारसा करीश्मा काही दिसला नाही. मात्र या दोघांनीही भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालं आहे. त्यामुळे आजच्या गणेश उत्सवातही ठाकरे बंधूंमधला बंधुभाव पाहण्यास मिळाला. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे हेदेखील उद्धव ठाकरेंसह उपस्थित होते. राज ठाकरेंनी यावेळी उद्धव ठाकरेंकडे तेजस ठाकरेंचीही चौकशी केली असंही माध्यमांतून समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीही गणेश उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले होते. तसेच ते या वर्षीही एकत्र आले आहेत.
