Chandrakant Khaire VS Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधान परिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या तिळगूळ वाटपावरून हा वाद चव्हाट्यावर आल्याचे सांगितले जात आहे. या वादादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना थेट सरळ करून टाकण्याची भाषा वापरली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मोठी पत्रकार परिषद घेऊन दानवे यांची पोलखोल करण्याचा इशाराही खैरे यांनी दिला आहे.
वादाचे नेमके कारण काय?
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना मकर संक्रांतीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तिळगुळाचे वाटप केले. त्यावेळी तुम्ही ठाकरे गटातील नेत्यांना तिळगुळ देणार का? असा प्रश्न माध्यमांनी त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे निष्ठावंत आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्याऐवजी मी त्यांनाच तिळगुळ देणार, असे उत्तर शिरसाट यांनी दिले. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचे काम केले असावे आणि म्हणून ते त्यांना तिळगुळ देत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला होता.
आणखी वाचा : BMC Result 2026 : मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
चंद्रकांत खैरेंचा दानवेंवर संताप
गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला. यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. मी उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याने आजवर पक्षात टिकलो आहे. महापालिका निवडणुकीत अंबादास दानवे यांनी काय आतले व्यवहार केले, याची मला कल्पना आहे. महापालिकेत निवडून येण्याची शक्यता असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांची तिकीटे कापण्यात आली, असा आरोप खैरे यांनी केला.
दानवेंना सरळ करून टाकण्याची भाषा
विधानसभा निवडणुकीत खैरे यांनी शिरसाट यांचे काम केले असावे, असे विधान दानवे यांनी केले होते. त्यावर संताप व्यक्त करताना, अंबादास दानवे यांना अजिबात अक्कल नाही, तो माझ्यावर अविश्वास दाखवत असेल तर १६ तारखेनंतर मी त्याला सरळ करीन. मी गद्दारी करणारा माणूस नाही, अशा शब्दांत खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर गेल्या चार दिवसांपासून अंबादास दानवे हे निवडणूक प्रचारातून गायब असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत मी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवे यांच्या विरोधात मोठी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य बाहेर काढणार, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.
