Sanjay Raut on Delhi Stampede: महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रात्री घडली. या घटनेत १८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर काँग्रेसने रेल्वेच्या निष्क्रिय कारभारावर टीका केली आहे. सरकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

शिवसेनेचे (ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत यांनीही या घटनेनंतर महाकुंभच्या आयोजनाला भाजपाने प्रचाराचा मुद्दा बनविला असल्याची टीका केली आहे. तसेच दिल्लीच्या चेंगराचेंगरीमध्ये मृतांचा आकडा काहीही सांगितला जात असला तरी हा आकडा १२० पर्यंत गेल्याचा दावाही त्यांनी केला.

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, दिल्लीतील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मृत्यूमुखी पडले याचा सरकारने दिलेला आकडा खोटा आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान १२० ते १५० लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपाकडून निमंत्रण दिले जात आहे. जणू काही हा भाजपाचा सोहळा आहे. लोकांना असे भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या. तुमच्यासाठी गाड्या, जेवण-राहण्याची व्यवस्था सर्व काही केले आहे. पण तसे काही नाही. इतकी व्यवस्था याआधी कोणत्याच कुंभमेळ्यात झाली नव्हती.

सात हजार लोक बेपत्ता

संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल सांगत होते की, ५० कोटी लोक कुंभमेळ्यात आले. पण मेले किती? याचा आकडा कधी सांगणार? प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मरण पावले? कुंभमेळ्यात सात हजार लोक बेपत्ता झाले आहेत. हे सात हजार लोक कुठे गेले? एकतर हे लोक चेंगराचेंगरीत मरण पावलेत किंवा बेपत्ता झाले आहेत. दिल्लीतील चेंगराचेंगरीतही सरकार आकडा दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

सरकारकडून महाकुंभमेळ्याचे मार्केटिंग सुरू आहे. पण यात लोक मरण पावत आहेत, याची सरकारला जराही चिंता नाही. गेल्या चार दिवसांपासून दिल्ली स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी गर्दी करत आहेत. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशमधून लोंढेच्या लोंढे प्रयागराजला निघाले आहेत. ठिकठिकाणी रेल्वे स्थानकावर प्रवाशी रेल्वे गाडीच्या काचा फोडताना दिसत आहेत. दरवाजे तोडून लोक आतमध्ये जात आहे, एवढी गर्दी अनावर झाली आहे. राष्ट्रपतीपासून मोठ मोठे उद्योगपती कुंभमेळ्यात जात आहेत. माध्यमेही याला प्रसिद्धी देतात. पण चिरडून मेलेल्या गरीब लोकांचा आक्रोशही दाखवला गेला पाहीजे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.