Sanjay Raut on CJI Surya Kant: २०२२ साली महाराष्ट्रात मोठे स्थित्यंतर घडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार पक्षातून बाहेर पडून त्यांनी मूळ शिवसेना असल्याचा दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षाला मूळ पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. तीन ते चार वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नुकतेच या प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. यावरून आता संजय राऊत यांनी थेट सरन्यायाधीश सूर्यकांत यांना टोला लगावला आहे.
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत हे विशेष कार्यक्रमासाठी मुंबईत आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपाचे मंत्रीही स्वागतासाठी उपस्थित होते. एकनाथ शिंदेंच्या एक्स हँडलवर या भेटीचे फोटो पोस्ट करण्यात आलेले आहेत.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंची ही पोस्ट रिशेअर करत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर तिरकस भाष्य केले. “म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख!”, असे एका ओळीचे कॅप्शन संजय राऊत यांनी या फोटोला दिले आहे. या आठवड्यात होणारी अंतिम सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचे हे विधान समोर आले आहे.
उद्धव ठाकरेंकडूनही सर्वोच्च न्यायालयाच्या चालढकलीवर टीका
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनीही सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणीवर टीका केली. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना या सुनावणीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जानेवारीमध्ये सुनावणी अपेक्षित आहे. पण ती कदाचित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ते डिसेंबर २०२६, २०२७, २०२८ किंवा २०२९ ला होऊ शकते.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे शिवसेनेच्या पक्ष नवा आणि चिन्हाबाबतची सुनावणी बुधवारी (२१ जानेवारी) होणार होती. पण अन्य कामकाज आणि इतर याचिकांवरील सुनावण्यांमुळे न्यायालयाने सत्तासंघर्ष आणि निवडणुकांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांची सुनावणी बुधवारी होवू शकली नाही. नव्याने तारखा दिल्या जातील, असे खंडपीठाने सांगितले.
