तरुणांनी बोलू नये, शिक्षित होऊ नये, त्यांनी त्यांच्या हक्कांबद्दल आवाज उठवू नये असे इथल्या सत्ताधाऱ्यांना वाटते. पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, फुले शाहू आंबेडकरांचा आहे. अन्यायाविरोधात पेटून उठणे ही इथल्या मातीची शिकवण आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. रोहित पवार यांनी उद्याची पिढी वाचावी, यासाठी या आंदोलनाला पाठिंबा देऊन ते देखील तुम्हा तरूण पोरांसोबत आंदोलनाला बसले आहेत. जंतर मंतरवरच्या गर्दीने सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे. मागे हटू नका असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. पुण्यामध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी हे विधान केलं आहे.

तुमच्या आवाजाने सरकार घाबरलं आहे-संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, तुमच्या आवाजाने सरकार घाबरले आहे. परंतु त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे. पुण्यातील आंदोलन म्हणजे महाराष्ट्राचे जंतर-मंतर आहे आणि जंतर-मंतरचा पॅटर्न असा आहे की ‘घेतल्याशिवाय राहत नाही’. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गेले. आता नंबर एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमनवार यांचा आहे. हे सरकार जर तरुणांचे ऐकणार नसेल तर कुणाचे ऐकणार आहे? राज्यात आणि देशात बदलून घडवून आणण्याची तरुणांमध्ये ताकद आहे. सरकारने तुमच्या आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सरकार मनाने पवित्र असते तर असे केले नसते. मागण्या समजून घेतल्या असत्या. एमपीएससी आयोगाचे शुद्धीकरण करणे ही मुलांची मागणी आहे . जे सरकार शुद्ध पद्धतीने निवडणुका घेऊ शकत नाही तर परीक्षा काय घेणार? मुलांनो तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा म्हणजे कुठलाही चुकीचा माणूस पदावर बसवला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

मी देशाचा पंतप्रधान असतो तर…

जंतर मंतरवर लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आंदोलक आले होते. तेथील मुलांच्या घोषणांनी मला खरोखर भुरळ पडली आहे. मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर घोषणा लिहिणाऱ्यांना पद्मश्री पुरस्कार दिला असता, असे मिश्किलपणे राऊत म्हणाले. ‘वडिलांची पँट फाटली तरी मुलगा मात्र मोदी-मोदी करतो आहे’, अशी देशातली परिस्थिती होती. परंतु आता बदल घडतो आहे. येथील तरूणच बदल घडवणार आहे. मुलांना अंधभक्त बनवण्याचा कारखाने सरकारने चालवले आहेत. परंतु अंधभक्तीचा गांजा आणि चरस उतरवण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. कारण हा महाराष्ट्र लढण्याचा लढवय्यांचा आहे, षंढांचा नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.