Shiv Sena (UBT) Oppose Bangladeshi player in IPL: बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचे पडसाद भारतातही उमटत आहेत. भारतात ठिकठिकाणी बांगलादेशविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना खेळण्यास घेऊ नये, अशीही मागणी जोर धरत आहे. बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) या संघाने यंदा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला ताफ्यात सामील केले होते. मुस्तफिजूर संघातून काढून टाकावे, अशी मागणी शिवसेनेने (ठाकरे) केली आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमध्ये खेळवण्यासा जोरदार विरोध दर्शवला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांचा छळ होत असून हा विषय आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलेला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे भारतीय भूमीवर आणि आयपीएलमध्ये त्यांच्या खेळाडूंवर खेळण्यापासून बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आनंद दुबे म्हणाले, “आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू खेळतात. पण पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंना तिथे स्थान देऊ नका. कारण ते आपला द्वेष करतात. तिथे आपल्या हिंदू बांधवांची हत्या होत आहे. पाकिस्तान-बांगलादेशचा डीएनए एकच आहे. दोन्ही देश गुडघ्यावर येऊन भारताची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवता कामा नये. मग ते क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय किंवा व्यापाराचे क्षेत्र असेल. आपल्याला त्यांच्यापासून अंतर राखायला हवे.”

शाहरुख खानला इशारा

“शाहरुख खानने तात्काळ त्या बांगलादेशी खेळाडूला त्याच्या संघातून काढून टाकावे. त्याने असे केल्यास ते देशभक्तीचे प्रतीक ठरेल. पण इतका गदारोळ होऊनही शाहरुख खानबाबत शंका व्यक्त होऊ शकते. ते या देशात राहून पैसे तर कमवतात पण या देशाची भावना समजत नाहीत, असे दिसेल. या देशासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा दिवस पाहण्यासाठी त्यांनी नक्कीच बलिदान दिलेले नव्हते”, अशी भावना आनंद दुबे यांनी व्यक्त केली.

Bangladeshi Cricketer in IPL
बांगलादेशी खेळाडूंना आता विरोध होत असून IPL मध्ये त्यांना खेळवल्यास सामने उधळवून लावण्याचा इशारा दिला गेला आहे.

आनंद दुबे पुढे म्हणाले, “शाहरुख खान उत्तम कलाकार आहेत. आपल्या सर्वांचेच ते लाडके आहेत. पण आता पैसे, व्यापार आणि मनोरंजनाचा विषय नाही तर देशाचा प्रश्न आहे. देशापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. शिवसेना किंवा भाजपाच्या नेत्यांनी सांगण्याआधी शाहरुख खानने त्या बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी करावी. जेणेकरून ते देशाच्या भावनेला समजतात, हा संदेश लोकांमध्ये जाईल.”

खेळपट्टी उखडून टाकण्याची धार्मिक नेत्याची धमकी

बांगलादेशी खेळाडू आयपीएलसाठी मैदानात खेळण्यास उतरले तर धार्मिक योद्धे मैदानावर चाल करतील आणि सामने बंद पाडतील, असा इशारा उज्जैनमधील रिंमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांच्यासह काही साधूंनी मध्यंतरी दिला होता. बांगलादेशमध्ये एकाबाजूला हिंदूंचा छळ होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी देऊ नये, तसेच इतर धार्मिक नेत्यांनीही यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्य पुजाऱ्यांनी केले आहे.

केकेआरने ९.२० कोटींची बोली लावून घेतले

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यांच्यावर कोलकाता नाइट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतले. मात्र आता अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनंतर केकेआर संघावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे.