मुंबईत वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा दारुण पराभव करून शिवसेनेने विजय मिळविल्याचे वृत्त कळताच सोलापुरातील शिवसैनिकांनी नव्या पेठेत एकत्र येऊन विजयोत्सव साजरा केला.
सेनेच्या तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा तब्बल २० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेऊन पराभव केल्याचा आनंद शिवसैनिकांमध्ये ओसंडून वाहत होता. शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील व शहर प्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी नव्या पेठेत एकत्र आले. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागरिकांना पेढे वाटण्यात आले. नारायण राणे यांना एका महिला शिवसैनिकाने ‘मातोश्री’च्या अंगणात लोळविले. राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन कोंबडी विकण्याचा धंदा करावा, असा उपरोधिक सल्ला शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला. या विजयोत्सवात पालिकेतील शिवसेना गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, माजी नगरसेवक सदाशिव येलुरे, विष्णू कारमपुरी, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे आदी शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.