महिन्याभरात पश्चिम विदर्भात उद्धव ठाकरेंचा दुसरा दौरा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच संघटना बांधणीवर भर

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्षबांधणीसाठी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियान व ‘मी कर्जमुक्त होणारच’ या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेने थेट शेतकऱ्यांमध्ये जात त्यांना आपलेसे करण्यावर भर दिला आहे. मध्यावधी निवडणुकीची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावरही विशेष भर दिला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह तूर खरेदीच्या विषयावरून शिवसेनेने भाजपवर अनेकदा टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने शिवसंपर्क व ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान राबविले. या अभियानासोबतच संघटन मजबूत करणे हा मुख्य उद्देश शिवसेनेच्या नेतृत्वाचा आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकरी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्य़ांसाठी अकोल्यात १५ मे हे अभियान राबवून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासोबतच पक्षाचा आढावा घेतला होता. या दौऱ्याला महिनाभराचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा उद्धव ठाकरे हे गुरुवारी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्य़ांतील शेगावच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संत श्री गजानन महाराजांचे दर्शन व पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत.

शिवसेनेसह विरोधकांचे आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या संपानंतर अखेर राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही शिवसेनेकडून सुरू आहे. कर्जमाफी जाहीर झाल्याने भाजपला विरोध करण्याचा मुद्दा शिवसेना व विरोधकांच्या हातातून गेला. त्यामुळे आता शेतकऱ्यांसोबत संपर्क कायम ठेवून पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. राज्यात एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी विदर्भावर वर्चस्व राहणे आवश्यक आहे, याची जाणीव सेनानेतृत्वाला झाली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यापूर्वीच्या काळात युतीमध्ये भाजपप्रमाणेच सेनेचीही शक्ती दिसून येत होती. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पीछेहाट झाली. निवडणुकीनंतर सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर दोन्ही पक्षांत टोकाचे मतभेद आहेत. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी होत आहे. पुढच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता विदर्भात पुन्हा बळ मिळविण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखली आहे. पश्चिम विदर्भ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. आजही पश्चिम विदर्भातील चारपैकी तीन खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र, ते भाजपसोबतची युती व मोदी लाटेत निवडून आले आहेत. स्वबळावर शिवसेना लोकसभेच्या तीनही जागा राखू शकते की नाही, असा प्रश्न आहे. पश्चिम विदर्भात सेनेचे तीन खासदार असले तरी, त्याचा प्रभाव विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आला नाही. या भागात शिवसेनेची वाताहत झाली. दुसरीकडे भाजपने पश्चिम विदर्भात आपला गड मजबूत केला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पश्चिम विदर्भात शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे.

अकोल्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत यांनी बांधणी करून पदाधिकाऱ्यांना कामाला लावले. एके काळी पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा चेहरा असलेल्या माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातात बांधले. गावंडे यांच्या पक्षांतराचा शिवसेनेला फारसा फरक पडला नाही. अकोला जिल्ह्य़ातून शिवसेनेचे विधान परिषदेवर गोपीकिसन बाजोरिया यांच्या रूपाने एकमेव आमदार आहेत. अकोला, बुलढाणा आणि वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बाजोरिया यांनी सलग तीन वेळा विजयश्री खेचून आणण्याची कामगिरी केली. अकोल्यात नगण्य असलेली शिवसेना विविध आंदोलनांच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. कर्जमाफीच्या मुद्दय़ावर शिवसेनेने भाजपचे पोस्टर फाडून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यावर टीका केली. यामध्येही विशिष्ट पदाधिकारी व एकच गट सक्रिय असल्याचे दिसून येते. अकोला जिल्ह्य़ात सक्षमपणे पुन्हा पाय रोवणे शिवसेनेसाठी आव्हानात्मक राहणार आहे. बुलढाणा शिवसेनेतही प्रचंड गटबाजी असून, नियुक्त्यावरून पक्षांतर्गत धुसफुस सुरू असते. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळीच बुलढाणा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला होता. ते बुलढाण्याचा आढावा घेत असताना वादावादी झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पक्षप्रमुखांनी ‘मातोश्री’वर बोलावून बुलढाणा जिल्ह्य़ातील नेत्यांची कानउघाडणी केली. बुलढाणा जिल्ह्य़ात भाजपने तळागाळात पाय रोवल्याने आता शिवसेनेपुढे नव्याने मोर्चेबांधणीचे आव्हान आहे. वाशीममध्येही सेनेचे हेच चित्र कायम आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा गड असलेल्या विदर्भात सेनेला सक्षम होणे राजकीयदृष्टय़ा अत्यावश्यक आहे.

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यातील दौऱ्यात भाजपवर तोफ डागली होती. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवत, जलयुक्तमधील चोर, दरोडेखोर शोधून काढून त्यांना शासन करणार असल्याची सिंहगर्जना केली. आता कर्जमाफीनंतर उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.

गटबाजी रोखणे महत्त्वाचे

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यापूर्वीच्या काळात युतीमध्ये भाजपप्रमाणेच सेनेचीही शक्ती दिसून येत होती. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पीछेहाट झाली. निवडणुकीनंतर सेना सत्तेत सहभागी झाली असली तरी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर दोन्ही पक्षांत टोकाचे मतभेद आहेत. मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने भाजपसाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी होत आहे.बुलढाणा शिवसेनेतही प्रचंड गटबाजी असून, नियुक्त्यावरून पक्षांतर्गत धुसफुस सुरू असते. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळीच बुलढाणा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला होता. ते बुलढाण्याचा आढावा घेत असताना वादावादी झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पक्षप्रमुखांनी ‘मातोश्री’वर बोलावून बुलढाणा जिल्ह्य़ातील नेत्यांची कानउघाडणी केली. बुलढाणा जिल्ह्य़ात भाजपने तळागाळात पाय रोवल्याने आता शिवसेनेपुढे नव्याने मोर्चेबांधणीचे आव्हान आहे. वाशीममध्येही सेनेचे हेच चित्र कायम आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांचा गड असलेल्या विदर्भात सेनेला सक्षम होणे अत्यावश्यक आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १५ जून रोजी पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामध्ये ते गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफी आणि पक्षाचा संघटनात्मक आढावा घेणार आहेत.   खा. अरविंद सावंत, पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख, शिवसेना