अहिल्यानगर : तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमिततेकडे, भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले व पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून पैसे भरले, परंतु अद्याप त्यांची मोजणी झालेली नाही. मात्र, धनदांडग्या लोकांची मोजणी मात्र गैरमार्गाने पूर्ण केली जात आहे, असाही आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे देत तालुक्यातील शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाबद्दल तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी शुल्क तीन-चार वर्षांपूर्वी भरूनही त्यांची मोजणी झालेली नाही. साध्या मोजणीचे शुल्क भरूनही धनदांडग्यांची अति-अति जलद मोजणी झाल्याची उदाहरणे आहेत. काही धनदांडग्यांची मोजणीचे पोटहिस्सेही चुकीच्या मार्गाने पूर्ण केले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी पूर्वी कार्यालयाने दिलेल्या हद्दी, खुणा जाणून-बुजून चुकीच्या दाखवल्या जात आहेत. धनदांडग्यांचे मोजणी शीट पूर्ण करताना त्या गटाची मोजणी अपूर्ण असतानाही पोटहिस्सा मात्र त्वरित पूर्ण करून दिला गेला. संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी मोजणी शुल्क भरलेले असतानाही मोजणी केली नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याकडे कार्ले व भोर यांनी लक्ष वेधले आहे. मोजणी केलेल्या काही मृत शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक व्हीआयपी दाखवले गेले आहेत. खंडाळा येथील गट क्रमांक १७० चे पैसे १ मार्च २०२१ रोजी भरूनही अद्याप मोजणी केली नाही. २७ जून २०२४ रोजी अति तातडीचे पैसे भरूनही अरणगावची मोजणी झालेली नाही, अशी उदाहरणे नमूद करण्यात आली आहेत.