सावंतवाडी नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या कार्यकाळात त्यांच्या दालनात घुसून सरकारी कामात हस्तक्षेप करीत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार याच्यासह आठजणांना येथील न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश दस्तगीर पठाण यांनी १७ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे या कामी अ‍ॅड. लीना पेडणेकर सावंत यांनी काम पाहिले. यामध्ये माजी तालुकाप्रमुख शैलेश तावडे, माजी उपतालुकाप्रमुख महेश पांचाळ, माजी शहरप्रमुख विलास सावंत, अजित सांगलेकर, रामचंद्र भराडी, गजानन कुडपकर, अहमद ऊर्फ राजू पटेल आदींचा सहभाग आहे. सावंतवाडी नगरपालिकेत २५ मे २०१३ रोजी दुपारी १२ वा. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर आपल्या दालनात शासकीय काम करीत असताना शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असलेले शब्बीर मणीयार यांच्यासह वरील आठजणांनी शहरातील शिल्पग्राम येथे चालू असलेल्या गटाराच्या बांधकामाबाबत जाब विचारण्यासाठी व सदरचे बांधकाम बंद करा, हे सांगण्याकरिता त्यांच्या दालनात प्रवेश केला. या वेळी यातील शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार यांनी टेबलावरील पेपरवेट हातात घेऊन टेबलावरची काच फोडून १५०० रुपयांचे नुकसान केले, तसेच टेबलावरच्या शाईची बाटली महेश पांचाळ यांनी घेऊन त्यांच्या अंगावर नोटांवर फेकली; परंतु ती भिंतीवर पडली, या वेळी त्याने पेपरवेट उचलून संगणकावर मारल्याने संगणक बंद पडून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले, विलास सावंत यांनी टेबलावरील फोन उचलून खाली फेकल्याने तो तुटून ८०० रुपयांचे नुकसान होते.
या प्रकरणानंतर नार्वेकर यांनी सरकारी कामात हस्तक्षेप करीत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी फिर्याद दिल्यावरून न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते, दरम्यान आज या प्रकरणी सुनावणी झाली, सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड् लीना पेडणेकर सावंत यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. याला न्या. दस्तगीर पठाण यांनी प्रतिसाद देत शब्बीर मणियार यांच्यासह आठ नव्याने विविध कलमाखाली एकत्रित १७ महिन्यांची सक्तमजुरी शिक्षा तर मुख्याधिकारी नार्वेकर यांना नुकसानभरपाई म्हणून पाच हजार व शासकीय मालमत्ता नुकसान भरपाई म्हणून २० हजार अशी एकूण २५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच दंड न भरल्यास २ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, शिक्षा झालेल्यांनी अपिलाकरिता जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेत तात्पुरती स्थगिती देत प्रत्येक १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मोकळीक केल्याचे आरोपींचे वकील अ‍ॅड्. तिरवडेकर यांनी सांगितले.