जंतरमंतरवरील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) आंदोलनानंतर अनेक तरुण राजकीय नेत्यांना सूर गवसला आहे. त्यापैकी एक म्हणजे शिवसेना आणि तिचीच उपशाखा असलेल्या मनसेचे युवा ठाकरे नेतृत्व. गेल्या काही दिवसांत ठाकरे बंधू मुंबई-महाराष्ट्रभर फिरत महाविद्यालयांना भेटी, आंदोलने करताना दिसत आहेत. मग त्यात फुटबॉलचे मैदान वाचविण्याकरिता करण्यात आलेले तिरंगा आंदोलन, रॅली असो वा मुंबईसह पुणे, संभाजीनगरमध्ये महाविद्यालयांना, मुलांच्या वसतिगृहांना किंवा त्यांच्या मेसना अचानक भेटी देऊन तिथल्या दुरवस्थेवर मनसे शैलीत केलेला आक्रमक प्रहार असो. या आंदोलनांतून ठाकरे बंधू तरुण-विद्यार्थीकेंद्री मुद्दे मांडत आहेत. पण, ज्या शिवसेना किंवा उपशाखांचे हे युवा नेते नेतृत्व करत आहेत, एकेकाळी त्या शिवसेनेची तरुणांमध्ये नेतृत्व रुजविण्याची स्वतःची अशी परंपरा राहिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणांना शिवसेनेकडे वळविले. आजचे ठाकरे तरुणांच्या आंदोलनाकडे वळताना दिसत आहेत.
संघटनाकडून आंदोलनापर्यंतचा हरवलेला प्रवास
बाळासाहेब ठाकरे यांनी तरुणांना संघटनेत आणण्यासाठी केवळ थेट भिडणारी, आक्रमक शैलीतील भाषणे किंवा मोर्चे-आंदोलने केली नाहीत. ‘गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ ही केवळ घोषणा नव्हे, तर संघटना उभारण्याची पद्धत होती. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळा, क्रीडा, सांस्कृतिक, गणेश मंडळे, स्थानिक लोकाधिकार समित्या अशा नाना मार्गांनी तरुणांना शिवसेनेशी जोडले. त्यावेळी रचलेल्या संघटनेच्या पायावरच शिवसेना नावाचा वटवृक्ष फोफावला. त्याला पुढे अनेक शाखा, उपशाखा फुटून, मुळापासून उखडण्याचा प्रयत्न करूनही हा वटवृक्ष तग धरून राहिला. तरुणांच्या भेटीगाठी घेत, त्यांचे रोजगाराचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रश्न हाताळत बाळासाहेबांनी आपल्या शिलेदारांच्या मदतीने युवकांचे अवकाश व्यापले. हे असे संघटन भल्याभल्यांकडे नाही. या संघटनेचे बळ आजही दसरा मेळाव्यापासून ते ठाकरेंनी पुकारलेल्या प्रत्येक आंदोलनाच्या निमित्ताने जमणाऱ्या गर्दीत दिसते. विद्यापीठातील पदवीधरांच्या सर्वच्या सर्व जागा शिवसेना जिंकते, ती केवळ याच संघटनात्मक शिस्तीच्या बळावर.
थोडक्यात, संघटनेचा पाया मजबूत करत, त्यावर आंदोलने, मोर्चे अशी भरणी करत तरुणांमध्ये आपले नेतृत्व रुजविण्यापर्यंतचा बाळासाहेबांचा प्रवास होता. त्यांनी त्यावेळच्या तरुणांमधील असंतोषाला, त्यांनी उभारलेल्या संघटनांतून, आंदोलनांतून वाट करून दिली. आजच्या ठाकरेंच्या पिढीकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे, वसतिगृहांचे, कॅन्टीनचे, खेळाच्या मैदानांचे, पेपरफुटी आणि रोजगाराचे प्रश्न हाताळले जात आहेत. पण हा प्रवास उलट, म्हणजे आधी आंदोलन, मग संघटन, असा म्हणावा लागेल. आज या संघटनेला खतपाणी घालेल असे वातावरण महाविद्यालयामध्ये नाही. महाविद्यालयातील थेट निवडणुका संस्थाचालक, शिक्षक, पालक, सत्ताधारी यापैकी कुणालाच नको असल्याने हा विषय पुढची वर्षानुवर्षे केवळ जाहीरनाम्यात एका ओळीपुरता सीमित राहणार आहे.
सीजेपी नंतर बदललेली भाषा आणि शैली
अशा परिस्थितीत सीजेपीने तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले. एकतर सीजेपीच्या नेत्यांची पाटी कोरी. त्यात बिनराजकीय चेहरा. यामुळे ते तरुणांपर्यंत चटकन पोहोचले. त्यांच्या आंदोलनाची शैली, भाषाही जेन-झीला भावणारी होती. शिक्षणाचा दर्जा, पेपरफुटी, विद्यार्थ्यांमधील तणाव, अनिश्चिततेची भावना, पेपरफुटीमुळे त्यात पडणारी भर, रोजगार असे तरुणांचे विषय त्यांनी हिरिरीने मांडले. जे तोपर्यंत क्वचितच राजकीय आंदोलनांच्या केंद्रस्थानी असत. एरवीचे नेते आघाडीवर आणि कार्यकर्ते मागे असे चित्र जंतरमंतरवर नव्हते. तेथे प्रत्येक आंदोलनकर्ता नेता होता.
या आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच ठाकरे बंधू त्यात सक्रियही झाले. जंतरमंतरची हवा थंड झाल्यावर अमित ठाकरे महाविद्यालयांना अचानक भेटी देणे, तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, विद्यार्थी शाखांचा विस्तार करणे याला प्राधान्य देऊ लागले. यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते आहे. तर आदित्य ठाकरे यांनी सीजेपीच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली. तिरंगा रॅली, मैदान बचाव आंदोलनातून तेही प्रसारमाध्यमांच्या झोतात राहिले. दोघेही समाजमाध्यमांवर आधीपासूनच कार्यरत होते. त्याचा वापर ते आता तरुणांमध्ये आपला राजकीय अवकाश निर्माण करण्याकरिता करत आहेत. व्यवस्थेविरोधात पेटून उठलेल्या असंतोषाला ते आपल्या नेतृत्वाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण प्रश्न असा आहे की, जेन-झी हे प्रस्थापित युवा नेतृत्व स्वीकारेल का?
भगवा विरुद्ध तिरंगा
आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या अनेक प्रतीकात्मक आंदोलनांत तिरंग्याला प्रामुख्याने स्थान दिले. जेन-झीच्या नव्या आंदोलनभाषेची बाराखडी प्रस्थापित युवा राजकीय नेतृत्वही कसे गिरवते आहे, हे यावरून दिसून येते. त्यामागे पक्षाचा शिक्का पुसला जाईल आणि प्रतिमा व पाठिंबा व्यापक होईल, असा विचार आहे. पण, सुरुवातीची मराठी अस्मितेची आणि पुढे पक्षाचा विस्तार करण्यासाठी धरलेली हिंदुत्त्वाची कास अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या आक्रमक राजकारणाच्या अवकाशात पूर्वापार भगव्यालाच कायम सर्वोच्च स्थान राहिले आहे. हा भगवा टाळून आंदोलन करता येते. पण त्यामुळे पक्षाचा आत्माच हरविला तर काय? या देशात राहणाऱ्या प्रत्येकालाच तिरंग्याचा अभिमान आहे. त्यामुळे कट्टरतेचा दावा करणाऱ्या भाजपालाही पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ म्हणावे लागते. अर्थात, रा. स्व. संघाचे कट्टरतेचे राजकारण करणाऱ्या शाखांकडून भगवा खाली येऊ दिला जात नाही. आदित्य ठाकरे यांच्यासाठीही शिवसेनेची ओळख असलेल्या पारंपरिक भगव्याऐवजी तिरंग्याला स्थान देणे, हे गुलाबी जॅकेट घालण्याइतके सोपे नव्हते. हे आव्हान पेलणाऱ्या शिवसेनेचा काँग्रेसप्रमाणे सर्वसमावेशक राजकारणाकडे प्रवास सुरू झाला आहे, असे म्हणायचे का? मग मराठीच्या अस्मितेच्या मुद्द्यावर पालिका निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाने आपली वेगळी ओळख नेमकी कशातून निर्माण करायची?
शिवसेनेचा आक्रमक चेहरा कुठे आहे?
आंदोलनाच्या या बदललेल्या बाराखडीमुळे शिवसेनेचा मूळ सूर हरविण्याची भीती आहे. याआधीही शिवसेनेने आपल्या आक्रमक आणि कट्टर प्रतिमेला बाजूला सारत मवाळ किंवा सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. राजकीय परिपक्वता किंवा बदलत्या काळाची गरज म्हणून ते त्या त्या वेळी घेतलेले निर्णय असू शकतात. परंतु, प्रतीकांनाच तिलांजली दिली गेली तर पक्षाचे असे काय राहील? रस्त्यावर उतरून आक्रमकपणे ठोकशाहीला आव्हान देणारा कार्यकर्ता ही शिवसैनिकांची ओळख राहिली आहे. आज त्या सैनिकाचा ‘अग्निवीर’ होण्याची भीती आहे. बाळासाहेबांच्या काळात आंदोलनांमध्ये पक्षाची आणि आंदोलनांची वेगळी अशी ओळख नव्हतीच. मात्र राजकारणही बदलत्या ‘ट्रेंड’नुसार करण्याच्या प्रकारामुळे पक्षीय प्रतीके जाणीवपूर्वक मागे सारली जात आहेत.
मुळात हे युवा प्रस्थापित नेतृत्व सीजेपीच्या आंदोलनाची पुरेपूर नक्कल करते आहे, हे म्हणणेही धाडसाचे ठरेल. आज सीजेपीचे अभिजीत दीपकेसह वरच्या फळीतले नेते गावपाड्यावर जाऊन शाळा, विद्यार्थ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीने मांडत आहेत, ते खरेतर बाळासाहेबांच्याच शैलीचे अनुकरण म्हणायला हवे. त्यांच्या प्रत्येक भेटीचा ‘राजकीय इव्हेंट’ होतोच असे नाही. परंतु, नेटाने हे तरुण एकाचवेळी समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, न्यायालये, शाळा-महाविद्यालये, देशभर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांवर पुकारलेल्या आंदोलनांत सहभागी होत आपले अस्तित्व दाखवत आहेत. त्यात कडवटपणे दिली जाणारी झुंज दिसते, सातत्य दिसते.
जेन-झीला (वर्चस्ववादी) ‘नेतृत्व’ हवे की ‘प्रतिनिधित्व’?
सीजेपीचे आंदोलन प्रस्थापितांविरोधात आहे. जे कधीतरी प्रस्थापित होते आणि आता केवळ नाईलाजाने विरोधात बसावे लागल्याने रस्त्यावर उतरून तिरंगा हातात घेत आहेत, त्यांचे वर्चस्वाचे राजकारण तरुण का म्हणून स्वीकारतील, हा कळीचा मुद्दा आहे. सीजेपीच्या आंदोलनात प्रत्येक कार्यकर्ता नेता आहे. त्यांना अशी राजकीय घराणी किंवा प्रस्थापित नेतृत्वाविषयी आकर्षण वाटण्याचे कारण काय? केवळ राजकीय घराण्यातील पुढची पिढी हे तरुण आहे म्हणून त्यांना जेन-झीने का स्वीकारावे? ‘आमच्यासाठी बोलणारा’ आणि ‘आमच्यातला नेता’ हा विचार ते नेतृत्व स्वीकारताना नक्कीच करणार. कारण कार्यकर्त्यांच्या जीवावर अचानक उठून महाविद्यालयांना भेटी देत फिरणे किंवा तिरंगा रॅली काढणे यातून संघटन उभे राहत नाही. ते केवळ विश्वासातून निर्माण होते. अमित ठाकरे विद्यार्थी नोंदणीवर भर देत आहेत. परंतु, बाळासाहेबांनी जसे शाखाशाखांना ‘राजकीय शाळा’ बनविले, तशी त्यांची मनविसे बनत नाही, तोपर्यंत विद्यार्थी नोंदणी हा विषय काही मिनिटांकरिता वृत्तवाहिन्यांच्या कव्हरेजपुरताच मर्यादित राहील.
तुलनेत प्रस्थापित युवा नेत्यांमध्ये गणले जाणारे रोहित पवार हे अधिक उजवे ठरतात. रोहित पवार मूड आला म्हणून सक्रिय होत नाहीत. अजितदादांच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या अपघाताच्या तपासापासून, एमपीएससी पेपरफुटी, परीक्षांमधील गोंधळ, एमपीएससी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी, शेतकरी कर्जमाफी, एमएचटी-सीईटी फॉरेन्सिक ऑडिटची मागणी, मतदारसंघ पुनर्रचना अशा असंख्य विषयांवरून उठताबसता सरकारला धारेवर धरत आहेत. संघटना बांधणीत हे सातत्य अत्यावश्यक आहे.
आजच्या युवा नेत्यासमोरील आव्हान अधिक जटिल आहे, यात वाद नाही. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आंदोलनाची भाषा बदलता येते, माध्यमे बदलता येतात, घोषणाही बदलता येतात. पण नेतृत्वाची विश्वासार्हता केवळ नव्या शैलीतून निर्माण होत नाही. ती संघर्षातून, सातत्यातून आणि जनतेच्या प्रश्नांशी असलेल्या बांधिलकीतून सिद्ध करावी लागते. ठाकरे बंधूंसमोर आज नेमके हेच आव्हान आहे. ठाकरे घराण्याच्या राजकीय वारशाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. आजोबांनी तरुणांच्या हातात केवळ भगवा दिला नव्हता, तर त्या भगव्यामागे विचार, संघर्ष आणि संघटनेची ताकद उभी केली होती. थोडक्यात, ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय शैलीची खरी परीक्षा गर्दी जमवण्यात नाही, तर ही गर्दी उद्याच्या राजकारणात ‘मत’परिवर्तनात किती दिसून येईल यात आहे.
रेश्मा शिवडेकर
reshma.shivadekar@expressindia.com
