महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. मनपातील प्रमुख सत्ताधारी शिवसेनेने ही निवडणूक कमालीची गांभीर्याने घेतलेली दिसते. जिल्हय़ाबाहेरील एक खासदार आणि तब्बल सहा आमदारांची या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, नगरपालिका किंवा मनपाच्या इतिहासात प्रथमच पक्षश्रेष्ठींनी मनपाच्या निवडणुकीसंदर्भात लक्ष घातले. आमदार अनिल राठोड यांनी बुधवारी मुंबईत पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार सुभाष देसाई व अन्य नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ठाकरे यांनी निरीक्षकांची समिती जाहीर केली. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील या समितीत आमदार प्रदीप जैस्वाल, आर. एम. वाणी, संजय शिरसाठ, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आणि विजय शिवतारे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जिल्हय़ातील खासदार भाऊसाहेब वाकचौरे व आमदार अशोक काळे, विजय औटी यांचा मात्र यात समावेश नाही.
मनपात पुन्हा पक्षाचीच सत्ता स्थापन व्हावी असा आदेशच ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले. शहरातील राजकीय स्थितीची माहिती त्यांना या वेळी देण्यात आली. माजी नगरसेवक अनिल शिंदे, पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, सुधीर पगारिया, विजय बोरुडे आदी या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपमध्ये मात्र अजूनही तुलनेने शांतता आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मागच्याच आठवडय़ात शहराच्या दौऱ्यावर येऊन गेले. मात्र मनपा निवडणुकीच्या दृष्टीने कोणतीही विशेष चर्चा या वेळी झाली नाही. मात्र पक्षाने इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यास गुरुवारपासूनच सुरुवात केली असून दि. १६पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुकांनी दि. १६पर्यंत त्यांचे अर्ज पक्ष कार्यालयात सादर करावे, असे आवाहन पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले आहे.