शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरुन प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली आणि त्यांचा तो फोन कॉल महाराष्ट्रात व्हायरल झाला. यानंतर विविध स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसंच विरोधकांनीही संजय गायकवाड यांच्यावर तोंडसुख घेतलं आणि संजय गायकवाड यांना समज दिली पाहिजे अशी मागणी केली. एवढंच नाही तर गोविंद पानसरे यांच्या सुनबाई मेघा पानसरे यांनीही संजय गायकवाड यांच्या भाषेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
संजय गायकवाड यांच्या आक्षेपाचं नेमकं प्रकरण काय?
शिवाजी कोण होता? या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या शीर्षकावरुन आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली. अत्यंत अश्लाघ्य शब्दांमध्ये शिवीगाळ करत संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना ठार मारण्याची धमकी दिली. ज्यानंतर संजय गायकवाड यांचा निषेध केला जातो आहे. विरोधकांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. १९८८ मध्ये लिहलेल्या या पुस्तकाचा आमदार गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला असून, त्यांनी प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया तर आल्याच पण गोविंद पानसरे यांच्या सुनबाई मेघा पानसरेंनी नाराजी व्यक्त केली.
मेघा पानसरे काय म्हणाल्या?
दरम्यान कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सुनबाई मेघा पानसरे यांनीही या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तसंच शिवरायांच्या महाराष्ट्रात हे असे प्रकार होणं निंदनीय असल्याचं म्हटलं आहे. संजय गायकवाड यांची भाषा अत्यंत संतापजनक आहे. ज्या पद्धतीने एक आमदार एका ज्येष्ठ नेत्याबाबत, त्याने त्याच्या पुस्तकात जे विचार मांडले आहेत त्याबाबत साधी माहितीही घेतलेली नाही. मला हे अजिबात वाटत नाही की संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं आहे. पुस्तक न वाचता या पद्धतीने बोलणं हे निषेधार्ह आहे. या पद्धतीची भाषा शिवाजी महाराजांचं नाव घेऊन केली जाते आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात एक आमदार अशी भाषा वापरतो याचा संताप माझ्यासह सगळ्यांनाच आला आहे.

शिवाजी कोण होता? हे नाव देण्यामागे गोविंद पानसरेंचा काय उद्देश होता?
८० च्या दशकात कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानं देण्यास सुरुवात केली. शिवाजी कोण होता असंच व्याख्यान ते देत होते. या नावावार तेव्हाही आक्षेप घेतला गेला. त्यानंतर गोविंद पानसरे यांनी भाषणावर आधारित हे पुस्तक लिहिलं. हे पुस्तक लिहिल्यावरही नावाचा वाद पानसरे यांच्या हयातीतही झाला होता. ज्याला गोविंद पानसरे यांनी वारंवार उत्तरही दिलं होतं. किती धमक्या आल्या तरीही मी नाव मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्र, खासकरुन ग्रामीण महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा पाईक आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या व्यक्तीबाबत आत्मियता असते, प्रेम असतं अशा व्यक्तीला कधीच मोठमोठी बिरुदं लावून संबोधत नाही. शिवाजी महाराज गोविंद पानसरेंना प्रिय होते. त्यामुळेच मी त्यांचं संबोधन एकेरी केलं आहे असं स्पष्टीकरण पानसरे यांनी दिलं होतं. तरीही वारंवार अशा पद्धतीचे वाद उकरुन काढले जातात आणि घाणेरडं राजकारण होतं. मात्र आजही धमक्या दिल्या जातात, निषेध केला जातो हे सगळं थांबलं पाहिजे, ही अपेक्षा मेघा पानसरेंनी व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
संजय गायकवाडांबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?
निरर्थक वाद निर्माण केला गेला आहे, आपल्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कुणीही अपमान करु शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कुणीही त्यांचा अशा पद्धतीने अपमान करणं शक्यच नाही. जे पुस्तक लिहिलं गेलं आहे, ते १९७९ ला लिहिलं गेलं त्याच्यावर आज वाद उकरुन काढायचा आणि दोन्ही बाजूंनी भिडायचं हे शुद्ध असामाजिक, असंवेदनशील असं हे कृत्य आहे. आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे का? हे मला माहीत नाही. आंदोलन करणाऱ्यांना ते आंदोलन का करत आहेत हे त्यांना माहीत आहे का हे मला माहीत नाही. केवळ कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा आणि चर्चेत राहायचं हे काही योग्य नाही. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.
संजय गायकवाड यांनी आज काय म्हटलं आहे?
“कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन आरती कार्यक्रम प्रशासनाने रद्द केला होता. आम्ही कायद्याचा सन्मान करून आमचा कार्यक्रम रद्द केला. तसाच त्यांचाही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरसुद्धा महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरता जाणुनबुजून २० लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या आणि त्या विकल्या. मग त्या पुस्तकाचं वाचन करायची गरज काय? त्यांच्या पुस्तक वाचनात आम्ही सहभागी होणार असून आम्ही अत्यंत विनयशीलतेने पुस्तक वाचणार आहोत. पुस्तक वाचनादरम्यान, महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला, तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार. परंतु एकेरी भाषेत उल्लेख केला आणि शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर त्याची जबाबदारी आयोजकांची किंवा पुस्तक वाचणाऱ्याची राहील
