मुंबई: भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार तसेच कर्तृत्व त्यांना मान्य नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी येथे केली.
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूरमध्ये बोलताना शिवाजी महाराजांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. यानिमित्ताने सकपाळ यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजप, आरएसएस आणि धीरेंद्र शास्त्रीचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराजांचा अपमान केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या विचारांनी देशाला आणि महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजप, संघाला मान्य नसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे आणि महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजप, संघाचे राष्ट्रीय धोरण आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
काळी टोपीवाले भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, छिंदम या भाजपच्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली. पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर जय भगवान गोयल या भाजपा नेत्याने ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’, नावाचे पुस्तक लिहून महाराज आणि मोदींची तुलना केलेली आहे, याचा संताप जनतेमध्ये आहे, असेही त्यांनी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवत यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्याने चुकीचा संदेश जात आहे, असेही सपकाळ म्हणाले.
