scorecardresearch

अमरावतीत शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं वातावरण तापलं; खासदार नवनीत राणांची ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी

अमरावती शहरात पुतळा हटवल्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.

अमरावती शहरात पुतळा हटवल्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकल्यामुळे सध्या तणावाची परिस्थिती आहे. तसेच लहुजी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न देखील पोलिसांनी हाणून पाडली. त्यामुळे शहरातील राजकारण चांगलंच तापलंय.

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी विनापरवानगी आमदार रवी राणा यांनी हा पुतळा बसवला होता. हा पुतळा अनधिकृतरित्या बसवण्यात आल्याचं कारण सांगत पोलिसांनी पहाटे हटवला. त्यानंतर शहरातील वातावरण तापलंय. त्यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले आहेत. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही गडबड करू नये आणि शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. आमदार राणा यांच्या घरालगत दोन्ही बाजूने बॅरिकेट्स लावण्यात आले आहे.

दरम्यान, खासदार नवनीत राणा घराबाहरे पडून कार्यकर्त्यांना भेटल्या. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खासदार राणांच्या घराबाहेर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं.

ठाकरे सरकारची हुकुमशाही…

“आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून ठाकरे सरकारने त्यांची हुकुमशाही वृत्ती दाखवली आहे. दहशतवादी असल्यासारखं खासदार आणि आमदारांना स्थानबद्ध केलं जातंय. आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. अशा प्रकारे ठाकरे सरकार छत्रपतींचा अपमान करतंय,” असा आरोप आमदार रवी राणा यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivaji maharaj statue removed in amaravati mp navneet rana alleges state government hrc

ताज्या बातम्या