संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत ईडीच्या कोठडी मागण्यावरून टीका केली आहे. जर संजय राऊत चौकशीत सहकार्य करत आहेत. तर मग तुम्हाला कोठडी हवी कशाला? अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. राज्यापालांनी केलेलं व्यक्तव्य, जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया आणि ईडीची कारवाई ही एकमेकांना पुरक असल्याचेही ते म्हणाले.

”ईडी कशापद्धतीने वागतं हे आज कोर्टात लक्षात आलं. ईडीकडून संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने तीन दिवसांची कोठीडी सुनावली आहे. त्यामुळे थोडीफार तरी न्यायव्यवस्था या देशात उरली आहे, हे यावरून दिसते. मुळात संजय राऊत हे चौकशी पूर्णपणे सरकार्य करत आहे. मग तुम्हाला कोठडी कशाला हवी, तुम्ही दिवसभर काय चौकशी करायची ती करा. मात्र, त्यासाठी कोठडी कशाला हवी. अनेकांना वर्षानुवर्ष कस्टडीत ठेवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालानेदेखील याबाबत आपले मत नोंदवले आहे. या यंत्रणांकडून कायद्याचा गैरवापर होतो आहे, हे स्पष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

पुढे बोलताना ते म्हणाले, ”आज जेपी नड्डा यांनी जे वक्तव केलं आहे. ते पाहिलं तर ईडीची कारवाई ही त्याच दिशेने होत असल्याचे लक्षात येते. एखाद्या राजकीय नेत्याला ज्याप्रकारे दबाव टाकून फसवलं जात आहे, त्यावरून निदान जनाची नाही तर किमान मनाची तरी लाग बाळगावी. खरं तर राज्यापालांनी केलेलं व्यक्तव्य, जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया आणि ईडीची कारवाई ही एकमेकांना पुरक आहे.”

दरम्यान, पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना आज ईडी कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, ईडीने संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. संजय राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी अशी मागणी केली होती. यानंतर कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान वैद्यकीय कारणास्तव रात्री १०.३० नंतर संजय राऊत यांची चौकशी करणार नाही, अशी हमी यावेळी ईडीने कोर्टात दिली.