परभणी महापालिकेच्या महौपारपदी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सय्यद इकबाल सय्यद खाजा यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या राजकीय वर्तुळात या निवडीची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाने एका मुस्लिम नेत्याला महापौर पद दिल्यानं भाजपाकडून आणि शिवसेना (शिंदे) पक्षाकडून टीका देखील करण्यात आली आगे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दानवे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. “परभणीत मुस्लिम महापौर झाला आणि इकडे भाजपाच्या अनेक ‘विद्वानांची’ मूळव्याध अचानक जिवंत झाली! खिशातून मोबाईलची डबडी काढून ज्ञान पाजणाऱ्या या ‘लुंग्या-सुंग्यांना’ बहुधा स्वत:च्याच पक्षाचा विसर पडलाय,” असे दानवे म्हणाले आहेत.

​अंबादास दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भाजपाने मंत्रीपद दिलेल्या मुस्लिम नेत्यांची यादीच दिली आहे. “भाजपाच्या ‘पावन’ गंगेत न्हाऊन निघालेली ही नावं वाचताना चष्मा नीट लावा: सिकंदर बख्त (संस्थापक सदस्य!), शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नकवी, नजमा हेपतुल्ला, एम.जे. अकबर, सय्यद झफर इस्लाम, जमाल सिद्दीकी, अब्दुल रशीद अन्सारी, पाशा पटेल, हैदर आझम. या सर्वांना भाजपाने मंत्री-खासदार केलं, तेव्हा तुमची ही मूळव्याध कुठे झोपली होती?”

​”महापौरांना मतदान करणारे आणि निवडून आणणारे नगरसेवक ‘हिंदू’ही आहेत, पण पोटशूळ उठलाय समाजमाध्यमांवरील पोराटोरांना! साबेर शेख मंत्री असताना मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते, हा इतिहास वाचायला बुद्धी लागते. काल आलेल्यांनी जिंतूरच्या उपनगराध्यक्षपदी कोण बसलंय ते बघावं आणि मगच जगाला ‘ज्ञानामृत’ पाजावं!” असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

परभणी महापालिकेतील एकूण ६५ जागा आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २५ जागा मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. त्यांना ११ जागांवरच समाधान मानावे लागले आहे, तर भाजपाच्या पदरात केवळ १२ जागा पडल्या. १ जागा इतर पक्षाला तर ४ अपक्ष निवडून आले आहेत.