राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना साताऱ्यात मात्र उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये नगरपालिकेच्या कामावरून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. सातारा नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात वाद पेटला आहे. उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सातारा शहरातली विकासकामं पाहणी करण्यासाठी शहरात स्कूटरनं फेरफटका मारला होता. त्यावरून शिवेंद्रराजेंनी टोला लगावल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी आज त्यांच्यावर टीका केली. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी साताऱ्यातच, समोरासमोर कधी यायचं?

उदयनराजे भोसले यांनी आज प्रतापगडावर बोलताना शिवेंद्रराजे भोसलेंना समोरासमोर येण्याचं आव्हान दिलं होतं. “संबंधित लोकं जी नावं ठेवतात मला त्यांनी हिंमत असेल तर समोरासमोर या ना…तेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम होते असं सांगतात. माझा फक्त एकच पूर्वनियोजित कार्यक्रम असतो तो म्हणजे जनतेची सेवा”, असं उदयनराजे भोसले म्हणाले होते. त्यावर शिवेंद्रराजेंनी टोला लगावला आहे.

“मी सगळ्यात जास्त काळ साताऱ्यात असतो. माझे दौरेही नसतात, काहीच नसतं. ते म्हटले यांचे नियोजित दौरे वगैरे असतात. पण कुठे दौरे असतात आमचे? त्यांचं म्हणणं आहे कामच करत नाहीत. मग आम्हाला कार्यही नाही आणि त्यामुळे बाहुल्यही नाही. तुम्ही सारखं समोरासमोर यायचं म्हणताय. आम्ही राहतोही समोर. या आमच्याकडे चहाला. चर्चा करायला. आम्ही कुठे नाही म्हणतोय”, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

“मी लोटांगण घालत फिरेन…,” दुचाकीवरुन फिरल्याने टीका करणाऱ्या शिवेंद्रराजेंना उदयनराजेंचं प्रत्युत्तर

समोरासमोर येऊन करायचंय काय?

दरम्यान, समोरासमोर येऊन काय करायचंय? असा खोचक सवालही शिवेंद्रराजेंनी केला आहे. “नेहमीसारखं समोरासमोर या म्हणतायत. मी त्यांच्या समोरच राहातो. पण नेमकं समोरासमोर येऊन करायचं काय आहे? मागच्या महिन्यात जिल्हा बँकेच्या मीटिंगला पहिल्यांदाच उदयनराजे आले होते. त्यावेळी आम्ही समोरासमोर होतो. तेव्हा हे विषय काढायचे होते. हा वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे”, असं ते म्हणाले.

“आता हे सगळं अंतिम टप्प्यात”

“आता यानंतर चालू होईल मिश्या काढेन, भुवया काढेन हे करेन, ते करेन. प्रत्येक निवडणुकीत हे डायलॉग येत असतात. या सगळ्यावर सातारकर नागरिक पडदा टाकल्याशिवाय शांत बसणार नाही. आता हे सगळं अंतिम टप्प्यात आलं आहे. विकासकामं, सातारची प्रगती सोडून इतर सर्व गोष्टींवर ते बोलले आहेत. नेहमी ठरल्याप्रमाणे डायलॉग झाले”, असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

“पेट्रोल परवडत नाही, तर बीएमडब्ल्यूमध्ये काय टाकणार?”

“खासदार साहेबांनी सांगितलं की मला पेट्रोल परवडत नाही म्हणून मी टूव्हीलरवरून गेलो. सातारकर म्हणून आम्हाला सगळ्यांनाच शॉकिंग आहे की महाराजांना पेट्रोल परवडत नाही. ते म्हटले की काही गोष्टींना कॉमन सेन्स लागतो आणि तो कॉमन नसतो. मला कदाचित कॉमन सेन्स कमी आहे. एकीकडे महाराज म्हणतात मला पेट्रोल परवडत नाही आणि कालच ८० लाखांनी नवी बीएमडब्ल्यू घेतली. पेट्रोल परवडत नसताना ही गाडी कशावर चालवणार आहात? ते म्हणतात लोळत जाईन-रांगत जाईन असं म्हणतात. कुणी चालत जायचं की रांगत जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. फक्त तुम्ही नगरपालिकेला लोळवण्याचा प्रकार करू नका”, अशा शब्दांत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivendra raje mocks udayan raje bhosale on satara elections pmw
First published on: 14-10-2021 at 18:28 IST