भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. साताऱ्यात सध्या बाजार समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच नगरपालिकेच्या निवडणुकाही काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, अशी एकंदरीत स्थिती असताना दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा खासदार उदयनराजे यांनी नुकतंच भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आरोप केले होते. शिवेंद्रराजे भोसले यांनी अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका आणि महिला बँकांद्वारे लोकांचे पैसे खाल्ले, असा आरोप उदयनराजे यांनी केला होता. तसेच असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला कसे आले? असा सवालही त्यांनी विचारला होता.

हेही वाचा- सातारा: “टोलनाका चालविणाऱ्यांनी मला शहाणपणा शिकवू नये…” शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

उदयनराजे यांच्या टीकेला शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदयनराजे यांच्या टीकेबद्दल विचारलं असता शिवेंद्रराजे म्हणाले, “माझं याउलट मत आहे. टोलनाके चालवणारे आमच्या घराण्यात जन्माला कसे आले? पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी टोल वगैरे घेणाऱ्यांच्या आणि अन्यायाविरोधात लढाई केली. असे अन्याय करणारे आमच्या घराण्यात जन्माला कसे आले? हेच मला कळत नाही.”

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले होते?

“शिवेंद्रराजे भोसले यांनी विविध संस्था स्थापन करून लोकांचे पैसे लुबाडले, हे सांगताना मला लाज वाटत आहे. हे बोलतानाही मला कमीपणा वाटतो. मी बोलावं की नाही, असा प्रश्न पडला आहे. पण त्यांनी अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँकांद्वारे त्यांनी लोकांचे पैसे खाल्ले. असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? हे दुर्दैवानं सांगावं लागतंय. आमच्या दारात कधी कुणी आलं नाही. आई-बहिणीवरून आम्हाला कुणी शिव्या घातल्या नाहीत,” असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivendraraje bhosale allegations on udayanraje bhosale over running toll plaza satara rmm
First published on: 27-03-2023 at 19:15 IST