“करोना ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग”; संभाजी भिडेंचं वक्तव्य

“करोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी”

Shivpratishtan, Sambhaji Bhide, Maharashtra, Central Government
"करोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी"

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा करोनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. करोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. दरम्यान करोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणार रोग आहे. करोना थोतांड आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत. सांगलीत दसऱ्यानिमित्त साध्या पद्धतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे

याआधी संभाजी भिडे यांनी एप्रिल महिन्यात करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य केलं होतं. “मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे, लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. असले हे शासन फेकून दिलं पाहिजे. अजिबात उपयोगाचं नाही”.

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान

“जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलं नाही. पण निर्लज्जपणात आपल पहिल्या क्रमांकावर आहोत,” असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

“जगाच्या पाठीवर १८७ राष्ट्रं आहेत. पण पारतंत्र्य गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा लाज ज्यांना वाटत नाही अशा १२३ कोटी नागरिकांचा देश जगात आहे. प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व पत्करत, त्यांचं खरकटं खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान,” असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी, मेंदू विकारवश झालेत

दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान  हिंदुस्थानकडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता  दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन संभाजी भिडे  राज्यकर्त्यांवर आणि महाविकास आघाडीवर चांगलेच भडकलेत. “प्रभू रामचंद्रांना जशी सोन्याच्या हरणाची भुरळ पडली आणि आपला विवेक हरवून बसले व त्या सोन्याच्या हरणाची शिकार करायला गेले, पुढे सीतेचे अपहरण झाले तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी, मेंदू विकारवश झालेत. त्यामुळेच तर दुर्गामाता दौड करण्यास आम्हाला परवानगी दिली नाही. पण हेच राज्यकर्ते लॉकडाऊन झाल्यानंतर २१ व्या दिवशी महसूल वाढतो म्हणुन राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात ते राज्यकर्ते बेशरम, नालायक आहेत,” अशा शब्दांत भिडेनी सरकारवर टीका केली. 

आमच्या आमदार, खासदार यांच्या अस्तित्वाचा काय उपयोग?

भल्या भल्याची बुद्धी निर्णय घेण्याच्या वेळी विकारवश होते तशा आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी ,मेंदू विकारवश झालेत, त्यामुळेच दुर्गामाता दौड करण्यास परवानगी दिली गेली नाही. दुर्गामाता दौडसारखी इतकी पवित्र गोष्ट कुठेही नाही.  आमच्या दुर्गामाता दौडीवर बंदी आली तरी आमचा आमदार, खासदार राज्यकर्त्याना जाऊन खडसावत नाही. असल्या आमदार, खासदार यांच्या अस्तित्वाचा काय उपयोग? असा सवाल करत भिडे यांनी स्थानिक आमदार आणि खासदारांवर टीका केली.

…तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते

‘यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा, तथा राजा’ असे म्हणत कसली सरकारे आपल्या राज्यात आहेत? असा सवाल करत उदात्त, पवित्र अंतकरणाने राज्य करणारा राज्यकर्ता आपल्याला मिळत नाही अशी खंत भिडे यांनी व्यक्त केली. “महाराष्ट्रामधील राज्यकर्त्यांच्या अंतकरणात शिवाजी-संभाजी महाराजांची वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivpratishtan sambhaji bhide controversial statement on covid 19 sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या