कराड : नागपुरातील ‘संविधान सन्मान यात्रा’दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांकडून कथितपणे झालेल्या हल्ल्याचे पडसाद कराडात उमटले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत कराड युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली.

यावेळी सरकार व पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत संविधान, लोकशाही आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे समर्थन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने मनुस्मृतीच्या निषेधार्थ नागपुरात ‘संविधान सन्मान यात्रा’ काढण्यात आली होती. ही यात्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या दिशेने जात असताना प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. मोरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ कराडात आंदोलन करण्यात आले.

सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘संविधान जिंदाबाद’, ‘मनुस्मृतीचा धिक्कार असो’, ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’, ‘जब जब फडणवीस डरता है, पुलिस को आगे करता है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलकांनी संविधानाचा सन्मान, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची भूमिका मांडत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

यावेळी दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कराडचे सुपुत्र शिवराज मोरे यांच्यावर पोलिस बळाचा वापर करून हल्ला करण्यात आला. त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत सरकारविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार असताना अशा प्रकारे पोलिस बळाचा वापर करणे योग्य नाही. या घटनेचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करीत असून, आगामी काळात सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूलराज पवार म्हणाले, शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी भ्याडपणे हल्ला केल्याचा आरोप असून, त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. दिल्लीपाठोपाठ नागपुरातही आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून हल्ले होत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार लोकशाही पद्धतीने नव्हे, तर हुकूमशाही पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांनी केला. आंदोलनकर्त्यांवर अशा प्रकारे अमानुष कारवाई होत असेल तर त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे. शिवराज मोरे यांच्यावरील कथित हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा आगामी काळात महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला.

आंदोलनात पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूलराज पवार, दिग्विजय सूर्यवंशी, सिद्धेश्वर शेटे, देवदास माने, पै. अक्षय सुर्वे, मुबीन पटेल, गणेश सूर्यवंशी, समीर इनामदार, दिगंबर महापुरे, नवतेज पवार, दीपक तांदळे, चैतन्य पाटील, नंदकुमार भोसले, शानूर देसाई, मुकुंद पाटील, रविराज पाटील, सतीश कदम, तानाजी भंडारे, दिग्विजय जमाले, प्रतीक निकम, नितीन पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.