राहाता : केंद्रीय कृषी व ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांतील शिर्डी, शनिशिंगणापूर व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ते देवदर्शनासह कृषी, ग्रामविकास पर्यटन करीत आहेत. त्यांनी काल, बुधवारी सायंकाळी बाभळेश्वर येथिल कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी व महिला बचत गटांशी संवाद साधला.
विकसित भारत – जी राम जी या विधेयकावर देशभरात आज, गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी बुद्रुक येथे चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक ग्रामसभेत केंद्र शासनाच्या वतीने प्रस्तावित असलेल्या विकसित भारत – जी राम जी या विधेयकावर चर्चा होणार आहे.
मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे काल सायंकाळी विशेष विमानाने शिर्डीत आगमन झाले. बाभळेश्वर येथिल कार्यक्रमानंतर ते शिर्डीत मुक्कामी थांबले. चौहान गेल्या ३५ वर्षांपासून सहकुटुंब सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या सुरुवातीला, दि. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला शिर्डीत साई दरबारी हजेरी लावतात. मंत्री चौहान यांनी बाभळेश्वर येथे शेतकरी आणि बचत गटातील महिलांशी संवाद साधत बचत गटांच्या स्टॉलला त्यांनी भेट देवून पाहाणी केली. यानंतर उपस्थित शेतकरी, बचत गटाच्या महिला व विद्यार्थी यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी पीक पद्धती, सिंचन, जलसंधारण, पीक विमा, बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत विवेचन केले. सेंद्रिय शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी चौहान यांना सेंद्रिय फळांची परडी तसेच इतर सेंद्रिय उत्पादने भेट दिली. बाभळेश्वर येथिल कार्यक्रमात प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्मान चौहान यांच्या हस्ते करण्यात आला.
आज, गुरूवारी नुतन वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी वृक्षारोपण करून शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. आपल्या दोन्ही मंत्रालयांतील अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करून विशेष संकल्प देणार असून आगामी वर्षातील कामकाजासाठी दिशा-निर्देश देतील. दुपारी २ वा. ते लोणी बुद्रक येथे आयोजित ग्रामसभेत सहभागी होऊन ग्रामस्थ, मजूर व श्रमिक बांधवांशी संवाद साधणार आहेत. तसेच सायंकाळी ते शनी शिंगणापूर येथे दर्शन घेणार आहेत.
नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन घेत पूजा केली. नंतर ते लोणी बुद्रुक येथे विशेष ग्रामसभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाच्या प्रस्तावित असलेल्या विकसित भारत – जी राम जी या विधेयकावर चर्चा करण्यासाठी नववर्षाच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकासाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर चौहान हे ग्रामसभेला संबोधित करणार आहेत. विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन – ग्रामीण’ अंतर्गत जुन्या मनरेगाच्या १०० दिवसांऐवजी आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला १२५ दिवस रोजगाराची हमी व पेरणी-कापणीच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मजूर मिळावेत, यासाठी शासकीय कामात ६० दिवसांच्या हंगामी विरामाची तरतूद, यांसारख्या विषयांवर या सभेत विचारमंथन होणार आहे.
उद्या, शुक्रवारी नाशिक येथे चौहान यांचा कृषी विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमात कुलगुरू व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सौजन्य भेटीनंतर सभागृहात औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ते मार्गदर्शन करणार असून, प्रश्नोत्तर व संवादात्मक सत्राद्वारे विद्यार्थी व संशोधकांशी थेट संवाद साधणार आहेत.
