शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झालं आहे. १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची घटना समोर येताच महाराष्ट्रातील राजकारणाला धक्का बसला आहे. यानंतर आता विनायक मेटेंसोबत घातपात घडला असावा, असा संशय मेटेंच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला जात आहे. विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केल्यानंतर त्यांच्या भाच्यानेदेखील घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनायक मेटेंच्या वाहनाचे चालक एकनाथ कदम एवढ्या रात्री कुणाशी तरी फोनवरून बोलताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले आहेत. यावरून मेटेंच्या भाच्याने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, चालक एकनाथ कदम एवढ्या रात्री कुणाशी तरी फोनवरून बोलताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळला आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ किंवा त्याचं सातत्याने जबाब बदलणं, संशयास्पद आहे.

हेही वाचा- “साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता” विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या…

त्यामुळे विनायक मेटेंसोबत घातपातही घडू शकतो. शिवाय चालक एवढ्या रात्री कुणाशी फोनवरून बोलत होता? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की पोलिसांनी चालकाची कसून चौकशी करावी. चौकशीनंतर जे काही सत्य असेल ते बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया विनायक मेटेंच्या भाच्यानं दिली आहे.

हेही वाचा- मोठी बातमी! विनायक मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या प्रकरणाच्या तपास झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेटे यांच्या अपघाताची माहिती समोर येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम.जी.एम रुग्णालयात भेट दिली होती. मेटेंच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsangram vinayak mete death road accident nephew suspicion over driver cctv video come out rmm
First published on: 17-08-2022 at 21:57 IST