scorecardresearch

“तुम्ही लिहून घ्या, आता मंत्रीमंडळ…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “आज जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वत:साठी रोजगार शोधतायत. स्वत:साठी दिल्लीला जातायत, गुवाहाटीला जाऊन…!”

aaditya thackeray slams eknath shinde
आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल! (संग्रहीत छायाचित्र)

ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे आजपासून शिवसंवाद यात्रेसाठी निघाले आहेत. नाशिकच्या इगतपुरीहून या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, जालना आणि बीडमधील काही गावांमधून ही यात्रा आणि आदित्य ठाकरेंच्या सभा होणार आहेत. इगतपुरीमध्ये यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने झालेल्या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, शिवसेनेत कोणताही गट नसून जे गेले ते गद्दार आणि राहिले ते शिवसैनिक असल्याचंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

“आपले मुख्यमंत्री २८ तास डाव्होसला गेले होते. खर्च झाले ४० कोटी, पण उद्योग किती आले हे अजून सांगू शकत नाहीयेत. इकडे-तिकडे आकडे सांगतात. मी तर त्यांना सांगेन की तुम्ही १०० लाख कोटीच सांगा. कुणाला किती शून्य आहेत त्यात ते कळणारच नाही. आम्ही फसत राहू, पण आज महाराष्ट्र फसणारा नाहीये”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही”

“राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाहीये. तुम्ही लिहून घ्या. हे मंत्रीमंडळ तर पडणारच आहे. पण पडण्याआधी विस्तारच होणार नाहीये. फक्त गाजरं देऊन ठेवलीयेत सगळ्या आमदारांना की तुला मंत्री बनवतो वगैरे. पण आता एकही नवीन मंत्री बनणार नाहीये. या मंत्रीमंडळात कुणी तरुण मंत्री, शेतकऱ्यांचा आवाज ऐकणारा किंवा महिलांचा आवाज ऐकणारा नाहीये. हे सरकार चालणार कसं? हे सरकार नक्की कुणाचं आहे. दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं हा प्रश्न पडला आहे”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.

“एक नक्की, हिला दिया”, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचलं; म्हणाले, “४० लोकांनी राजीनामा दिला तरी…”

“हे सरकार पडणार म्हणजे पडणार”

“आज जे सरकारमध्ये बसलेत, ते स्वत:साठी रोजगार शोधतायत, स्वत:साठी दिल्लीत जातात. स्वत:साठी सूरतेला जातात. स्वत:साठी गुवाहाटीला जातात. झाडं, डोंगर बघून येतात. पण लोकांसाठी काही मागितलेलं तुम्ही ऐकलंय का? कधी तुम्ही ऐकलंय का की लोकांसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेलेत आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी मगितलं आहे. कारण असं घडलंच नाहीये कधी. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे तुम्ही लिहून घ्या. मुख्यमंत्री दिल्लीत फक्त स्वत:साठी जातात, लोकांसाठी जात नाहीत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आगपाखड केली.

“मुंबई महानगर पालिकेत २५ वर्षं शिवसेनेची सत्ता होती. मुंबईला पाणी देण्यासाठी आम्ही इथे धरण बांधू शकलो. पण एवढ्या वर्षांत राज्य सरकार इथे कधी स्थानिकांसाठी धरण बांधू शकलं नाही, पाणी अडवू शकलं नाही”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

कदाचित शरद पवार जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील – गोपीचंद पडळकर

“येताना मी एका पेट्रोल पंपावर थांबलो तेव्हा अनेक लोक मला गाडीवर टक टक करून सांगायचे की आदित्यजी तुमचं सरकार परत आलं पाहिजे. कारण उद्धव ठाकरेंसारखा नेता आणि मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही.अनेक लोकांचं असं असतं की माझ्या जिल्ह्यात काम झालं पाहिजे. पण उद्धव ठाकरे आणि माझा असा कोणता जिल्हाच नसल्यामुळे आणि आख्खा महाराष्ट्रच आमचा जिल्हा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगती व्हावी, शाश्वत विकास व्हावा, चांगले उद्योग यावेत यासाठी आम्ही काम करत होतो”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 14:19 IST