राज्याच सध्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची चर्चा असून शिवसेनेतील बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे गट-भाजपा सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अपेक्षेप्रमाणेच या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे. मात्र, त्यासोबतच विधानभवनात पायऱ्यांवर दिल्या जाणाऱ्या घोषणा हा देखील यंदा चर्चेचा विषय ठरला आहे. केले काही दिवस ५० खोकेच्या घोषणा चालल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी थेट शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’ अशा आशयाचे बॅनर्स गळ्यात घालून शिंदे गटाच्या आमदारांनी पायऱ्यांवर उभं राहात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, त्यावर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे गटातील आमदारांना जाहीर आव्हानच दिलं आहे.

“मला त्यांची कीव येते, एका मंत्रीपदासाठी…”

आमदारांची आपल्याला कीव येते, असं आदित्य ठाकरे विधानभवनात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. “गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसं उभं केलंय. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागतं. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“मला एवढंच दु:ख आहे की…”

“मला एवढंच दु:ख वाटतं की या लोकांना आम्ही कमी काय केलं? ४० वर्षांत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी खाती सोडली नसतील, अशी खाती या लोकांना आम्ही दिली. आम्ही त्यांना सर्वकाही दिलं. आमच्याच पाठीत खंजीर खुपसून आज ते पायऱ्यांवर उभे आहेत. या ४० लोकांसोबत विश्वासघात झाला आहे. त्यांना काय काय गळ्यात घालून आमच्यासाठी उभं केलं आहे. आम्हाला शिव्या दिल्यावर मंत्रीपदं मिळतील हे आजचं चित्र आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’, शिंदे गटातील आमदारांची आदित्य ठाकरेंवर टीका

“ज्यांनी हे बॅनर्स गळ्यात घातले आहेत, त्यांनी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आवाज उठवला असता तर मंत्रीपदं मिळतील असे संकेत महाराष्ट्रात गेले असते, तर खरंच राज्य पुढे चाललंय असं वाटलं असतं. आजही हे स्वत:चाच विचार करत आहेत. हे सगळं आज जगजाहीर झालंय. त्यामुळे यांच्यावरचे संस्कार लोकांसमोर आले आहेत”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना लक्ष्य केलं आहे.

“होऊन जाऊ द्या एकदाचं”

“चला ना, ४० लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणुका लढवू. मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं”, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.

“ज्याची भिती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते. पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदांची. ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागतंय. गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय. ही निदर्शनं करताना त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसतंय. चेहऱ्यावर भिती दिसत आहे. महाराष्ट्रात गद्दारी पटलेली नाही हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून हे गेले आहेत”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.