शिवसेनेतील बंडखोरीमुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना आणि बंडखोर आमदार गटाने आपापल्या दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी दोघांमधील संघर्षही शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत असताना आता शिवसेनेचे मुखपत्र असेलल्या सामनातील रोखठोक या सदरातून मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली होती, असे ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – “सचिन वाझे हे ‘मातोश्री’वर दर महिन्याला…”; शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

“शिंदेंनी अहमद पटेलांशी संधान बांधले”

“काँग्रेस-राष्ट्रवादीवर एकनाथ शिंदे आज टीका करतात, पण महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी संधान बांधले होते. तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. सौदेबाजी फिसकटली”, असा गोप्यस्फोट ‘रोखठोक’मधून करण्यात आला आहे.

“तेव्हा शिंदेंचा विरोध नव्हता?”

“काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही आता एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे. ‘‘भाजप-शिवसेना ‘युती’चे सरकार असताना व फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता (2014). त्या शिष्टमंडळात स्वतः एकनाथ शिंदे होते’’, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते”, असा खोचक टोलाही एकनाथ शिंदे यांना लगवण्यात आला आहे.

हेही वाचा – “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

“तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरेंना सांगितले”

“एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले होते व १५ ते २० आमदारांसह ‘येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर (एफआयआर) तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती” , असा खुलासाही रोखठोकमधून करण्यात आला आहे.

“दिघेंना मदत करणारे काँग्रेसी होते”

“आनंद दिघे यांना ‘टाडा’तून जामीन मिळावा यासाठी त्यांच्या काँग्रेसमधील चाहत्यांनी प्रयत्न केले. एके दिवशी पहाटे 4 वाजता यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी ‘वर्षा’वर बैठक बोलावली. काही सूचना दिल्या व दिघे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. ‘वर्षा’वर तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार होते. तेही काँग्रेसचे! दिघे यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यविधी सार्वजनिक ठिकाणी, मोकळय़ा मैदानात व्हावेत व तेथेच त्यांचे स्मारक व्हावे यासाठी पुढाकार घेणारे प्रभाकर हेगडे हे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष होते. भाजप या काळात कुठेच नव्हता” , असेही रोखठोकमध्ये म्हटले आहे.