गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभा उमेदवारीचा मुद्दा आता आरोप-प्रत्यारोपांपर्यंत येऊन ठेपला आहे. शिवसेनेनं पक्षाची उमेदवारी देऊ केल्यानंतर संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय ठामपणे सांगितल्यानंतर सेनेने संजय पवारांना उमेदवारी दिली. यानंतर आज संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून, विशेषत: मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द कसा पाळला नाही, हे सांगताना सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला. तसेच, ही राज्यसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं. यानंतर संभाजीराजेंच्या दाव्यांवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी नामी संधी घालवल्याची भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप केला. “मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी माझा दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी स्वराज्यच्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“..असं कुठेच समोर आलं नाही”

दरम्यान, संभाजीराजेंच्या दाव्यांनंतर शिवसेनेवर टीका सुरू झाली असतानाच शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी टीव्ही ९ शी बोलताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार, विचार घेऊन चालते. सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे दिलेला शब्द मोडला असं कधीच घडलं नाही. या उमेदवारी प्रकरणावरून कुठेच एकदाही अशी बातमी आली नाही की शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभा करणार आहे”, असं ते म्हणाले.

“कडवट शिवसैनिकाला उमेदवारी द्यायचं उद्धव ठाकरेंच्या मनात होतं”

“गेल्या वेळी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा राष्ट्रवादीनं त्यांना दोन जागा मिळाव्यात असा आग्रह धरला. उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्यांच्या आग्रहाला मान दिला. तेव्हा राष्ट्रवादीनं अधिकृत उमेदवार म्हणून दुसरं नाव फौजिया खान यांचं दिलं. त्यांचे दोन उमेदवार तेव्हा राज्यसभेवर गेले. आता आम्हाला दोन सदस्य पाठवण्याची वेळ आली होती. त्यामुळे शिवसेनेचे दोन राज्यसभा खासदार जात असतील, तर ते मूलत: शिवसेनेचे असायला हवेत. हा विचार पक्ष आणि संघटना म्हणून महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीने एका कडवट शिवसैनिकाला ही संधी द्यावी असं उद्धव ठाकरेंच्या मनात होतं”, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय; म्हणाले, “…आता मी मोकळा झालोय”!

“दरम्यान, संभाजीराजेंचा विषय आला. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्या आदरापोटी एका शिवसेना कार्यकर्त्यावर अन्याय होईल, पण छत्रपती आपल्यासोबत येतील तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. त्यामुळे उदार मनाने त्यांनी सांगितलं की या, तुमचं स्वागत करतो. पण तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून गेलं पाहिजे. राज्यसभेत अपक्ष म्हणून गेलात, तर ती आमची संख्या म्हणून नाही धरली जाणार. राजांबद्दल मला आश्चर्य वाटतं की त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. आम्ही काय अस्पृष्य होतो का? तुम्ही तुमच्या विचारांशी ठाम असाल, तर आम्हीही आमच्या विचारांशी ठाम राहणार”, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

भाजपावर निशाणा

“त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार खासदार म्हणून जाणार आहेत. ज्यांनी संभाजीराजेंना पहिल्यांदा नामनियुक्त खासदारपद दिलं, त्या भाजपानं गेल्या १५ दिवसांत अवाक्षरही काढलं नाही. त्यांचं एकच म्हणणं, शिवसेनेनं द्यावं. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारी ही माणसं”, असं म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपावर देखील निशाणा साधला.

संभाजीराजेंना शिवसेनेनं पाठिंबा नाकारण्याआधी नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत जाहीर केला घटनाक्रम!

“तुम्ही संधी न स्वीकारता अव्हेरलीत”

“संभाजीराजेंबद्दल आदर ठेवून सांगतो. तुम्ही खरंच एक नामी संधी घालवली. सातारची गादी बघा कशी फिरली. ती राष्ट्रवादीत होती, नंतर भाजपात गेली. पण गादीबद्दलचा आदर कधी कमी झाला नाही. तो तुमच्याबद्दलचाही कधी कमी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला सर्वोच्च आहेत. इतके चांगले संबंध असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेना कार्यकर्त्याला डावलून राजांना उमेदवारी देण्याची तयारी दाखवली. पण ती तुम्ही न स्वीकारता अव्हेरली. तुम्ही शिवसेनेत येऊन समाजाचं काम करू शकत नव्हता का? संभाजीराजेंबद्दल आमच्या मनात आदर आहेच. त्यांनी आत्ता घेतलेली भूमिकेचंही आम्ही स्वागत करतो”, असं देखील सावंत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena arvind sawant on sambhaji raje chhatrapati rajyasabha election pmw
First published on: 27-05-2022 at 13:03 IST