"हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर...", शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले... | shivsena attacks bjp over hindu jan aakrosh morcha in mumbai saamana editorial ssa 97 | Loksatta

“हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर…”, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

“देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून…”

“हिंदू समाजाचे मोर्चे म्हणजे स्वत:च्या नामर्दानगीवर…”, शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतरण’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विरोधात कायदे करण्यासाठी काल ( २९ जानेवारी ) मुंबई हिंदू समाजाने ‘जन आक्रोश मोर्चा’चं आयोजन केलं होतं. यावरून शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे. हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल, असा टोला शिवसेनेने ‘सामना’तून केंद्रातील भाजपा सरकारला लगावला आहे.

“पराभवाचे हादरे बसू लागले की, भारतीय जनता पक्ष त्यांचा हुकमी खेळ सुरू करीत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे. देशभरातील हिंदू अचानक ‘खतऱ्या’त आला असून धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’ अशा मुद्यांवर भाजपा व त्यांच्या मिंधे गटाने मुंबईत ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’ काढला. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगितले गेले, पण आघाडीवर भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. ‘‘आम्ही सगळे हिंदू म्हणून या मोर्चात सहभागी झालो आहोत,’’ असे या मंडळींनी जाहीर केले, पण हे मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.

हेही वाचा : चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना, भाषणात म्हणाल्या; “जोतिबांचा शोध…”

“महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे. हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा ‘आक्रोश मोर्चा’ निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे. या आधीच्या काळात ‘इस्लाम खतरे में है’ असे मुस्लिम समाज म्हणत असे. आता हिंदुत्ववादी वगैरे म्हणविणाऱ्यांच्या राजवटीत ‘हिंदू खतरे में’ असे म्हणण्याची वेळ हिंदूंवर आली आहे, असा टोमणा शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

“कश्मीर खोऱ्यात आजही हिंदू पंडितांचे पलायन सुरू आहे, पंडितांच्या हत्या थांबलेल्या नाहीत व हजारो हिंदू पंडित जम्मूच्या रस्त्यांवर न्यायासाठी आक्रोश करीत आहेत. त्याच पंडितांचा आक्रोश मनात साठवून मुंबईत हिंदूंचा ‘जन आक्रोश’ उसळला असेल तर दिल्लीत बसलेल्या शक्तिमान हिंदू राज्यकर्त्यांना त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असं शिवसेनेने म्हटलं.

“हिंदू आक्रोशाचे एक प्रमुख कारण समोर आले ते म्हणजे मौलाना मुलायमसिंग यांचा ‘हिंदू’ सरकारने केलेला गौरव. प्रजासत्ताक दिनी मोदी सरकारने मुलायम यांना पद्मविभूषणाने गौरवान्वित केले. हा राममंदिरासाठी बलिदान केलेल्या हजारो कारसेवकांचा अपमान आहे. कारण या हिंदू कारसेवकांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश मौलाना मुलायम यांचेच होते. त्यांचा राष्ट्रीय गौरव केल्यानेच हिंदू जन आक्रोश उसळला व शिवसेना भवनासमोर जमा झाला,” असेही शिवसेनेने सांगितलं.

हेही वाचा : “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन् हळहळत असेल आज…” संजय राऊतांना केशव उपाध्येंचं प्रत्युत्तर!

“त्या सगळ्यांचं शिवसेनेवर ‘लव्ह’ आहे व दिल्लीच्या ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध ‘जिहाद’ आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरुद्धचा त्यांचा आक्रोशही महत्त्वाचा आहे. एक बरे झाले की, हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल,” असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 07:49 IST
Next Story
‘एमपीएससी’ भरतीमध्ये जाचक अटींचा विद्यार्थ्यांना फटका! विभागनिहाय गुणवत्ता यादीमुळे मुख्य परीक्षेला मुकण्याची शक्यता