शिवसेना, भाजप मतविभाजनाचा राष्ट्रवादीला फायदा

 शिवसेना आणि भाजप यांच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात झाला.

|| हर्षद कशाळकर

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचे निकाल बुधवारी लागले. यात राष्ट्रवादी काँग्रेसने चार नगरपंचायतीवर वर्चस्व राखले. शिवसेना आणि भाजप यांच्या मत विभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक न लढवणे शिवसेनेला काही प्रमाणात मारक ठरले.

 जिल्ह्यातील खालापूर, पाली, माणगाव, म्हसळा, तळा आणि पोलादपूर नगरपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात तळा आणि म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. तर पाली नगर पंचायतीवर शेकापच्या मदतीने सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ३९ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जिल्ह्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला.

 शिवसेना आणि भाजप यांच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात झाला. तळा नगरपंचायतीवर यापुर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र या नगरपंचायत निवडणकीत त्यांना सत्ता राखता आली नाही. शिवसेना आणि भाजप यांनी स्वबळावर ही निवडणूक लढवली.

भाजपचे तीन, तर शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले. या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रावादी कांग्रेसला झाला. त्यांचे दहा नगरसेवक निवडून आले. माजी जिल्हाप्रमुख रवि मुंढे यांनी भाजप प्रवेश शिवसेनेला महागात पडला.

   पाली नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी केली. या निवडणूकीतही शिवसेना आणि भाजप यांच्या मतविभाजनाचा थेट फायदा राष्ट्रवादी शेकाप आघाडीला झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा तर शेकापचे ४ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे ४ तर भाजपचे २ नगर सेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने नगरपंचायत मिळवली.

माणगाव नगर पंचायतीसाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांनी एकत्र येत माणगाव विकास आघाडी स्थापन केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापच्या मदतीने निवडणूक लढवली. या निवडणूकीत माणगाव विकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी केली. शिवसेना प्रणीत माणगाव विकास आघाडीला ९ जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीला ८ जागा मिळाल्या. शिवसेना भाजप एकत्र आल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही.

   खालापूर नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले. त्यामुळे शिवसेनेला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २, शेकापला ७ जागा मिळाल्या. त्रिशंकु अवस्थेमुळे आता येथील सत्तेची चावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात असणार आहे. राष्ट्रवादीच्या मदती शिवाय इथे शिवसेना अथवा शेकाप येथे सत्ता स्थापन करू शकणार नाहीत.

  नगरपंचायत निवडणूकीत ३९ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने तळा, म्हसळा, पाली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. खालापूर मधील सत्तेच्या चाव्या त्यांच्याच हातात असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना भाजप मतविभाजनाचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनेच्या ३५ जागा निवडून आल्या आहेत. पण पोलादपूर ही एकच नगरपंचात त्यांना स्वबळावर जिंकता आली आहे. माणगाव मध्ये आघाडीच्या माध्यातून त्यांना सत्ता मिळणार आहे. तर खालापूर मध्ये सत्तेसाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मनधरणी करावी लागणार आहे.

 जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणूकीत बोध घेण्याची गरज

 नगरपंचायत निवडणूकीनंतर आता जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्या इतपत जिल्ह्यात कुठल्याच पक्षाची ताकद नाही. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीतील बोध घेऊन आगामी निवडणूकीची रणनिती सर्वच राजकीय पक्षांना आखावी लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena bjp congress results of six nagar panchayats akp

Next Story
मंडणगड नगर पंचायतीमध्ये अपक्षांच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी