"मी राज्यपालांचा आगाऊपणा..." काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र! | shivsena chief uddhav thackeray on governor bhagat singh koshyari bjp eknath shinde rmm 97 | Loksatta

“मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!

राज्यपालांच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलं आहे, त्याचा मी…

uddhav thackeray on governor bhagat singh koshyari
उद्धव ठाकरेंची राज्यपाल कोश्यारींवर टीका

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानाचाही खरपूस समाचार त्यांनी घेतला. ते बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

भारतीय जनता पार्टीवर टीकास्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा हा आता आयात पक्ष झाला आहे. हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:कडे काहीच शिल्लक राहील नाही, म्हणून ते सगळं बाहेरून चोरून घेत आहेत. त्यामुळे मी ४० रेडे किंवा ४० गद्दारांना प्रश्न विचारतोय की, त्यांच्यामध्ये अजूनही मर्दानगी शिल्लक असेल तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की, ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही. मिंधे गटाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणि चेहरा पाहिजे, शिवसेनेचं नाव पाहिजे, आणि मोदींचा आशीर्वाद पाहिजे, मग तुमची मेहनत कुठे आहे?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- “शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, ते जसं…” राऊतांवर टीकास्र सोडताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

“बुलढाणा हे जिजामातेचं जन्मस्थान आहे, शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण आपल्या छत्रपतींचा सातत्याने अपमान केला जात आहे. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी तिकडे वळवले जात आहेत. कारण त्यांना गुजरातच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. काल-परवा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईही बोंबलेत. त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोटवर आपला हक्क सांगितला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्येही निवडणुका आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राचेही तुकडे करायला मागे-पुढे बघणार नाहीत. तेव्हा आपले मिंधे मुख्यमंत्री शेपूट आत घालून सरळ म्हणतील, ४० गावं द्यायची आहेत, ते देऊन टाकू. पंतप्रधान बोललेत उद्या पाकव्याप्त काश्मीर भारतात घेतल्यानंतर १०० गावं महाराष्ट्राला देतो” अशी टोलेबाजी उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा- “ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर…”, जिजाऊंचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

राज्यपालांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा सावरकरांचा अपमान केला, तेव्हा आम्ही हे सहन करणार नाही, असं बोललो. आम्ही ज्या त्वेषाने बोललो, तसं मिंधे सरकार बोललं नाही. मिंधे सरकारने राज्यपालांचा निषेध नव्हे तर त्यांनी राज्यपालांची बॅग पॅक करून त्यांना परत पाठवून देण्याची हिंमत दाखवून द्यायला पाहिजे होती. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा राज्यपालांचा आगाऊपणा मी सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून त्यांचा पूर्ण आदर बाळगतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलं आहे, त्याचा मान मी राखू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 18:31 IST
Next Story
“महाराष्ट्राचे देव संपले का?” शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मुख्यमंत्री ४० रेड्यांचे बळी…”