शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यापासून शिवसेना भवनातून शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या काळात त्यांनी एकनाथ शिंदे गटावर अनेकदा टीका केली. मात्र, आज ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर आणि विशेषत: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर तोंडसुख घेतलं. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी त्यावरून भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, भाजपाचे नव्यानेच नियुक्त झालेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत त्यांच्यावर देखील खोचक शब्दांत टिप्पणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मार्मिक’च्या वर्धापनदिनी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यात नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. “राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज ‘आझाद’ आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नड्डांच्या विधानाचा घेतला समाचार

दरम्यान, जे. पी. नड्डांच्या एका विधानाचा उल्लेख करत त्यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “८-१० दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेलं वक्तव्य लोकशाहीला घातक आहे की नाही, हा विचार करायला हवा. ते म्हणाले, की या देशात एकच पक्ष राहणार आहे, बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषत: शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. बघू”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मंत्र्यांना पदं मिळाली आहेत, पण…”, उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर परखड टीका!

“बावनकुळेंच्या नावात किती कुळे आहेत?”

“नड्डांनी जे प्रदेशाध्यक्ष नेमले आहेत, त्यांच्या नावात किती कुळे आहेत हे मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळं उतरली, तरी शिवसेना संपवणं शक्य नाही. मग ती बावन असतील किंवा एकशे बावन असतील. त्याने मला फरक पडत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टिप्पणीदेखील केली.

“..तर तो अमृत महोत्सव कसला?”

“देशाची मांडणी संघराज्य पद्धतीची आहे. त्यात अनेक राज्य एकत्र आले आहेत. मग नड्डांना नेमकं काय म्हणायचंय? प्रादेशिक पक्ष संपवायचेत म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नको आहेत का? तुम्ही गादीवर बसलात म्हणून ‘हम करे सो कायदा’ ही काही लोकशाही नाही. अमृतमहोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल, तर तो अमृत महोत्सव कसला?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

“७५व्या वर्धापनदिनी आपण नेमके कुठे आहोत, याचा आढावा सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. सरकारने कार्यक्रम दिलाय हर घर तिरंगा… पण ज्यांच्याकडे घरच नाही, ते तिरंगा लावणार कुठे?” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena chief uddhav thackeray slams bjp j p nadda chandrashekhar bawankule pmw
First published on: 13-08-2022 at 20:00 IST