scorecardresearch

एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या घराचे भूमिपूजन; तिरुपतीला जाताना गमावला होता जीव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता

Shivsena, Eknath Shinde, Sumant Raikar, Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं होतं. एकनाथ शिंदे यांनी या शिवसैनिकाच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून सुमंत रुईकर यांच्या घराचं भूमीपूजन करण्यात आलं.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचं भूमीपूजन करण्यात आलं. या भूमीपूजनाला एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यापुढील पूर्ण जबाबदारी एकनाथ शिंदे यांचे सहकारी बाजीराव चव्हाण यांच्यावर देण्यात आली आहे. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दुसरीकडे रुईकर कुटुंब शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मदतीमुळे भावूक झाले होते.

उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी बीड ते तिरूपती पायी निघालेल्या शिवसेना कार्यकर्त्याचं वाटेतच निधन!

“शिवसेनेने मदत करावी अशी मागणीच मीच केली होती. शिवसेनेने, एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आहे. बोले तैसा चाले असं त्यांनी करुन दाखवलं आहे. त्यांनी निराधार सोडणार नाही, डोक्यावर छत बांधू हा शब्द पाळला असून दोन महिन्यात घर बांधून देणार आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत,” अशा भावना नातेवाईक दीपा रुईकर यांनी व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी भविष्यातही काही अडचण आल्यास मदतीचं आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सुमंत रुईकर यांचा रस्त्यातच मृत्यू

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मध्यंतरी मानेची शस्त्रक्रिया पार पडली. आता उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं राज्य सरकारकडून आणि अनेक मंत्र्यांकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्रालयातील काही बैठकांमध्ये उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी देखील होऊ लागले आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंवर उपचार सुरू असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून सातत्याने प्रार्थना करण्यात येत होत्या. अशाच एका कट्टर शिवसेना कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी तिरुपती बालाजीला साकडं घालण्यासाठी बीड ते तिरूपतीपर्यंत पायी जाण्याचा निर्धार केला होता. पण दुर्दैवाने त्यांचा हा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही.

बीडमधील शिवसेनेचे नेते आणि माजी नगरसेवक सुमंत रुईकर हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते. उद्धव ठाकरेंच्या प्रकृती अस्वास्थ्याचं वृत्त कळताच त्यांनी पक्षाध्यक्षांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांनी यासाठी तिरूपती बालाजीला साकडं घालण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बीडपासून थेट तिरुपती बालाजीपर्यंत पायी चालत जाण्याचा निर्धार त्यांनी केला.

मोठ्या हिंमतीनं ४७ वर्षीय सुमंत रुईकर पायी चालत निघाले. तेलंगणा राज्यात ते पोहोचले देखील. पण तिरुपतीला पोहोचण्याआधीच त्यांची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांच्या उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. अखेर तिरुपतीला जाण्याचा त्यांचा निर्धार पूर्ण होऊ शकला नाही. वाटेतच त्यांचं दुर्दैवी निधन झालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena eknath shinde fulfil promise to give home to sumant raikar who dies while going to tirupati for uddhav thackeray sgy

ताज्या बातम्या