रत्नागिरी – रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील नाचणे आणि कसबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये थेट सामना रंगला असून ही निवडणूक चांगलीच चुरशीची ठरत आहे. दोन्ही गटांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्याने स्थानिक राजकारण तापले असून दोन्ही शिवसेनांची ताकद पणाला लागली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नाचणे जिल्हा परिषद गटात ‘गद्दारांना धडा शिकवण्याच्या’ निर्धाराने उबाठा सेनेचे शिवसैनिक रणांगणात उतरले आहेत. या गटात उबाठा सेनेचे उमेदवार शशिकांत बारगोडे हे शिंदे गटाचे प्रकाश रसाळ यांच्याविरोधात लढत देत आहेत. त्यामुळे पक्ष संघटन सक्रिय झाले आहे.

पंचायत समिती निवडणुकीतही उबाठा सेनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कुवारबांव गणातून माजी उपसरपंच उमेश राऊत, तर नाचणे गणातून विजयकुमार ढेपसे निवडणूक रिंगणात आहेत. उमेश राऊत यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा ठसा मतदारांमध्ये प्रभावी ठरत असून ढेपसे यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त करत घरोघरी प्रचार मोहीम राबवली आहे.

दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गट यंदा केवळ स्थानिक राजकारणापुरता न राहता थेट सत्तासंघर्षाचे केंद्र बनला आहे. शिंदे गटाचे रचना महाडिक यांचा हा पारंपरिक ‘होम पीच’ मानला जात असला, तरी बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही लढत अधिक निर्णायक ठरत आहे. शिवसेना एकसंघ असताना रचना महाडिक यांनी याच गटातून सलग तीन वेळा विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले होते. विकासकामे, मतदारांशी थेट संपर्क आणि मजबूत संघटनामुळे कसबा गट शिवसेनेचा ‘अभेद्य गड’ म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता हा गड हादरलेला दिसत आहे.

उबाठा सेनेकडून कडवई येथील विशाखा कुवळेकर यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत उडी घेत थेट रचना महाडिक यांना आव्हान दिले आहे. पहिल्यांदाच मैदानात असल्या तरी कुवळेकर यांची आक्रमक प्रचारशैली, स्थानिक प्रश्नांवरची ठाम भूमिका आणि ठाकरे सेनेचे संघटन यामुळे लढत दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे.

अनुभव आणि राजकीय पकड असलेल्या रचना महाडिक विरुद्ध बदलाची हाक देणाऱ्या विशाखा कुवळेकर अशी ही लढत आता संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय दिशेला कलाटणी देणारी ठरत आहे. कसबा गटात शिंदे सेनेचा गड कायम राहणार की ठाकरे सेनेचा झेंडा फडकणार, याचा फैसला लवकरच होणार असून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.